Rajma Cultivation नांदेड ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रथमच रब्बीमध्ये पिकात बदल करुन हरभऱ्याऐवजी (Chana) राजमा पिकाची लागवड (Rajma Cultivation) केली आहे. सगरोळी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून बियाणांची उपलब्धता झाल्याने यंदा जिल्ह्यात एक हजार एकरवर लागवड झाली आहे. सध्या पिकाची काढणी (Rajma Harvesting) सुरु असल्याची माहिती सगरोळीचे प्रा. कपिल इंगळे यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात रब्बीमध्ये हरभरा, गहू, रब्बी ज्वारी यासारखी पिके घेतली जातात. परंतु मागील काही वर्षापासून हरभरा पिकाला मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन घटले आहे.
यासाठी या भागातील शेतकरी पिक पद्धतीत बदल करण्याच्या तयारीत होते. अशातच शेतकरी करडई सारख्या पिकाकडे वळले आहेत. देगलूर तसेच धर्माबाद तालुक्यात करडईचे क्षेत्र सात हजार हेक्टरपर्यंत वाढले आहे.
या पिकासोबतच शेतकऱ्यांचा राजमा पिकाच्या पेरणीकडे कल दिसत होता. यासाठी बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ संचलीत कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेतला होता.
बिलोली तालुक्यातील बेळकोणी येथील अमृतालयम शेतकरी उत्पादन कंपनीने कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राजमाचे बियाणे उपलब्ध करुन दिले. यामुळे जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, नायगाव, मुदखेड, कंधार व धर्माबाद या भागात रब्बीमध्ये सर्वाधिक एक हजार एकरवर पेरणी झाली आहे.
नवीन पिक असल्याने शेतकऱ्यांत यंदा या पिकाविषयी कुतूहल होते. सध्या या पिकाची काढणी सुरु असल्याने अनेकांच्या नजरा या पिकाच्या उत्पादनाकडे लागल्या आहेत. काही ठिकाणी काढणी केलेल्या शेतकऱ्यांना एकरी चार ते आठ क्विंटल उत्पादन येत असल्याची माहिती मिळाली.
या पिकाला नांदेड, बीड या ठिकाणी बाजार आहे. लागवडीचे पहिले वर्ष असल्याने शेतकऱ्यांना या पिकाच्या लागवड तंत्राबाबत अनुभव घेणे महत्वाचे असल्याचेही प्रा. कपिल इंगळे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.