नाशिक : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात द्राक्ष (Grape Prunning) गोडी बहर छाटणी सुरू होते. मात्र संततधार पाऊस (Rainfall) व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीच्या तडाख्यात गोडीबहर छाटणी कामे अडचणीत आली. त्यामुळे हंगाम प्रभावित (Grape Season Affected) होऊन जवळपास चार आठवडे पुढे गेल्याची स्थिती आहे. चालू वर्षी आव्हानात्मक परिस्थितीत द्राक्ष उत्पादक हंगामाला सामोरे गेले आहेत. आता अंतिम टप्प्यातील शिल्लक छाटणी कामे पूर्ण होत असून, आगामी गणिते बाजारातील मागणी व त्यानुसार होणारा पुरवठा यावरच ठरणार आहेत.
सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष छाटण्यांना वेग घेत असतो; मात्र संततधार पावसामुळे बागेत पाणी साचून राहिल्याने वेळेवर छाटण्या करता आल्या नाहीत. त्यामुळे जसा पाऊस उघडेल व वाफसा तयार होईल त्यानुसार छाटण्या पूर्ण करण्यात आल्या. पावसाने उघडीप दिल्यानंतर अंदाज घेऊन २५ सप्टेंबरपासून छाटण्यांच्या कामांना गती आली. नियमित छाटण्यामध्ये चांदवड, निफाड, दिंडोरी, नाशिक, सिन्नर, येवला तालुक्यांत ऑक्टोबरनंतरच वेग आला. पाऊस थांबला की छाटणी सुरू आणि आला की बंद अशीच एकंदरीत परिस्थिती होती.
दिवाळीला मजूर न मिळाल्याने कामे लांबणीवर गेल्याने छाटण्याची गर्दी झाल्याची परिस्थिती होती. एकाचवेळी कामकाज होत असल्याने मजुरांची उपलब्धता करून कामे पूर्ण झाली. मात्र अतिवृष्टीच्या तडाख्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात छाटलेल्या बागांमध्ये प्रादुर्भाव वाढल्याने अनेक शेतकऱ्यांचा पीक संरक्षण खर्च वाढता राहिला. एकीकडे कृषी निविष्ठा महागल्याने शेतकऱ्याची मोठी आर्थिक कोंडी झाल्याची स्थिती आहे.
...अशा राहिल्या अडचणी
- ऑगस्टमधील संततधार पावसामुळे पाने काळे पडून खराब
- सुरुवातीला छाटणीपूर्व १५ दिवस अगोदर पानगळ करण्यासाठी समस्या; पानगळीसाठी फवारण्यांचा यंदा परिणाम कमी
- सप्टेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यातील छाटण्या रखडल्या
- ऑक्टोबर मध्यावधीपर्यंत काळ्या जाड जमिनीच्या बागांमधून पाणी वाहते असल्याने वेळेवर वाफसा तयार न झाल्याने छाटणी कामे लांबणीवर
- छाटणीनंतर विषाणूजन्य करपा, डाऊनी, भुरी यासह किडीमध्ये उडद्या, पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव
- पावसामुळे प्रतिबंधात्मक फवारण्या वाढत असल्याने पीक संरक्षण खर्चात वाढ
- पावसामुळे घड जिरण्याची व गोळी घड होण्याची समस्या
ऑक्टोबरमध्ये झालेल्या बागांमध्ये डिपिंग सुरू आहे. तर नोव्हेंबर सुरुवातीच्या बागांमध्ये फेल फूट कामे सुरू आहेत. बागा लेट झाल्याने कडी तयार न झाल्याने घड कमकुवत निघत असल्याची स्थिती आहे. काही ठरावीक वाणांना ही अडचण नाही. कमी-जास्त माल निघण्याची अडचण आहे. घड अशक्त असून गोडी घड निघत आहेत. शेंडे तयार न होणे ही प्रमुख अडचण आहे. वाफसा वेळेवर न झाल्याने सिंचन व अन्नग्रहण क्षमता अडचणीत आहे.बापू साळुंके, द्राक्ष उत्पादक, वडनेर भैरव, ता. चांदवड
छाटणी लांबणीवर गेल्याने एप्रिल महिन्यात एकत्रित माल येण्याची अडचण कमी होईल. २२ ऑक्टोबरपर्यंत पाऊस राहिला. त्यामुळे पाने खराब झाली. त्यामुळे वाफसा, पानगळ असे परिणाम झाले. नंतर तापमान वाढ झाल्याने कार्यक्षमता कमी होऊन उशिराच्या बागे काही प्रमाणात शेंडे तयार न होणे, घड बारीक राहणे, गोळी घड असे परिणाम दिसून येत आहेतअनंत मोरे, द्राक्ष उत्पादक, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.