जळगाव ः खानदेशात यंदा कलिंगड लागवड (Water Cultivation) वाढेल, असे दिसत आहे. शेतकरी लागवडीसाठी नियोजन (Cultivation Planning) करीत असून, पूर्वमशागत पूर्ण झाली आहे. पपईपाठोपाठ आता कलिंगड लागवड खानदेशात वाढत आहे. नंदुरबारमधील शहादा, नवापूर, तळोदा, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, धुळे, साक्री, जळगावमधील यावल, जामनेर, चोपडा, जळगाव, रावेर या भागात कलिंगड लागवड रब्बीत सतत वाढत आहे.
खरिपातही जामनेर, जळगाव, चोपडा, यावल, धुळे, शिरपूर भागात अनेकांनी कलिंगडाचे चांगले पीक घेतले. आता रब्बीत लागवड वाढून ती साडेचार ते पाच हजार हेक्टरवर जाईल, असे दिसत आहे. कांदा, मका पिकाऐवजी आपले क्षेत्र कलिंगड पिकाखाली आणण्याचे नियोजन अनेकांनी केले आहे.
मागील वर्षी रब्बीत किंवा डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान खानदेशात सुमारे साडेतीन हजार हेक्टरवर कलिंगडाची लागवड झाली होती. जळगाव जिल्ह्यात ही लागवड सुमारे दोन हजार हेक्टरवर झाली होती. यंदा जळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच हजार ते दोन हजार ७०० हेक्टरवर कलिंगड पीक असेल, असे दिसत आहे. तर धुळे व नंदुरबारातील क्षेत्रही सुमारे दीड हजार हेक्टरवर जाईल, असे संकेत आहेत.
कलिंगडाचे विविध वाण निवड करून लागवडीसाठी रोपेनिर्मिती केली जात आहे. ६२ ते ६५ दिवसांत येणाऱ्या वाणांना शेतकऱ्यांची पसंती आहे. कॅप्सूल आकाराच्या कलिंगडाला मागणी असते. यामुळे अशा कलिंगडाच्या उत्पादनाचे नियोजन केले जात आहे.
या भागात लागवड अधिक
जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कलिंगड लागवड चोपडा तालुक्यात होईल, असे संकेत आहेत. यापाठोपाठ जामनेर, यावल, मुक्ताईनगर, जळगाव, रावेर या भागात होईल. तसेच धुळ्यात शिरपुरात अधिक कलिंगड पीक असेल. नंदुरबारात शहादा तालुक्यात कलिंगडाचे पीक अधिक असते.
शेतकऱ्यांचा अचूक नियोजन करण्यावर भर.. .
वर्षागणिक कलिंगड लागवड वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापसाखालील क्षेत्र रिकामे करून त्यात पूर्वमशागत करून घेतली आहे. पूर्वमशागत करून शेत भुसभुशीत करून घेणे, गादीवाफे तयार करून त्यात ठिबक व प्लॅस्टिक मल्चिंगची यंत्रणा करून घेत आहेत. रोपे तयार झाल्यानंतर ती लागलीच लागवडीसाठी आणली जातील. त्यासाठी शेत तयार करून घेतले जात आहे. लागवडीसाठी मध्यम, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडली जात आहे. तज्ज्ञांकडून लागवड, खते व फवारणीचे वेळापत्रक शेतकरी तयार करून घेत आहे. कलिंगड पीक संवेदनशील व खर्चिक असल्याने काटेकोर, अचूक नियोजन करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.