Rabi Season Crop Loan पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC Bank) वतीने (पीडीसीसी) सुरू वर्षीच्या रब्बी हंगामातील (Rabi Season) पिकांसाठी एकूण ४२४ कोटी ६७ लाख ५ हजार रुपयांचे पीककर्ज (Crop Loan) वितरण केले आहे. या कर्ज वितरणाचा जिल्ह्यातील ६३ हजार २६० शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. शेतकऱ्यांना आणखी येत्या ३१ मार्चपर्यंत रब्बी पिकांसाठी कर्ज वितरण केले जाणार आहे.
यंदाच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी कर्ज घेणारे नवीन तीन हजार ७३ शेतकरी वाढले आहेत. दरम्यान, कर्जवितरणाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ७०.९७ टक्के इतके पूर्ण झाले आहे.
गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील आजअखेरपर्यंतच्या कर्ज वितरणाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत २८ कोटी ६ लाख ६५ हजार रुपयांचे अधिकचे पीक कर्ज वितरण झाले आहे.
रब्बी हंगामातील पीककर्ज हे शून्य टक्के व्याजाने मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गेल्या महिनाभरात रब्बीसाठी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे.
ल्हा बँकेच्या वतीने मागील १५ वर्षांपासून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने वितरित करण्यात येत होते.
यंदाच्या आर्थिक वर्षांपासून केंद्र सरकारने व्याज परताव्यावरील सवलतीत अर्ध्या टक्क्याने कपात केली आहे. त्यामुळे शून्य टक्का व्याजाची ही योजना अडचणीत आली होती. परंतु राज्य सरकारच्या सूचनेनुसार या अर्ध्या टक्क्याचा फरकाचा भार उचलण्याची तयारी राज्य सहकारी बँकेने दर्शविली आहे.
जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांसाठी जिल्हा बँकेने ५९८ कोटी ३५ लाख रुपयांचे पीककर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट यंदाचा रब्बी हंगाम संपेपर्यंत आहे. आतापर्यंत यापैकी ७०.९७ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याची माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली.
विविध पिकांसाठी दिले जाते कर्ज :
रब्बी पिकांव्यतिरिक्त बँकेकडून ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, भात, भुईमूग अशा अनेक पिकांना पीककर्जाचे वितरण करत आहे. त्यामुळे दरवर्षी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामात आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, शिरूर, पुरंदर या तालुक्यांत पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. बँकेकडून रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, करडई अशी विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात.
परंतु या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीककर्जाचा आधार घेऊन खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांचे नियोजन करून पिके घेतात.
जिल्ह्यातील रब्बी पीककर्ज दृष्टिक्षेपात ....
- रब्बीसाठी पीक कर्जवितरण ५१८ कोटी ३५ रुपये.
- आतापर्यंत प्रत्यक्षात पूर्ण झालेले वितरण ४२४
कोटी ६७ हजार रुपये.
- पीककर्जाचा लाभ घेतलेले एकूण शेतकरी ६३ हजार २६०.
- पीककर्जाचा लाभ झालेले क्षेत्र ४९ हजार ६९० हेक्टर.
- गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील आजअखेर वितरण ३९६ कोटी ६० लाख ४० हजार रुपये.
- गेल्या वर्षी तुलनेत यंदा वितरणात झालेली वाढ २८ कोटी ६ लाख ६५ हजार रुपये.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.