Devendra Shirurkar
दुग्धोत्पादनात अग्रेसर 'अमूल' हा ब्रँड प्रस्थापित करणाऱ्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने सेंद्रिय कृषी उत्पादनाच्या बाजारात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अमूलचे सेंद्रिय गव्हाचे पीठ बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहे.
अमूलने शनिवारी (तारीख २८ मे) आपले पहिले सेंद्रिय उत्पादन गव्हाचे पीठ बाजारात विक्रीसाठी दाखल केले असल्याची घोषणा केली आहे. सेंद्रिय गव्हाखेरीज मूग डाळ,चना डाळ, बासमती तांदूळ इत्यादी सर्व प्रकारची सेंद्रिय उत्पादने बाजारात विक्रीसाठी दाखल होणार असल्याचेही अमूलतर्फे सांगण्यात आले आहे.
'अमूल' हा दुग्ध उत्पादनातील ब्रँड विकसित करणाऱ्या आणि देशभरात लोकप्रिय करणाऱ्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने सेंद्रिय कृषी उत्पादनांच्या विक्रीसाठी पुढाकार घ्यावा, असा आग्रह केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी फेडरेशनकडे धरला होता. अमूलने केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्र्यांचा सल्ला मनावर घेत २८ मे रोजी सेंद्रिय गव्हाचे पीठ विक्रीसाठी बाजारात विक्रीसाठी दाखल केले.
सध्या सेंद्रिय उत्पादकांसमोर आपल्या मालाच्या गुणवत्तेबाबतच्या चाचण्या कुठे करायच्या ? हा प्रश्न आहे. कारण ही प्रक्रिया खर्चिक आहे. त्यामुळे अमूलतर्फे देशात पाच ठिकाणी सेंद्रिय उत्पादनांच्या चाचणीची सुविधा असलेल्या प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत.
चाचणीचा खर्च कमी करण्यासाठी या प्रयोगशाळांत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस.सोढी यांनी स्पष्ट केले.
यातील पहिली प्रयोगशाळा अहमदाबाद येथे उभारली जाणार आहे. इतर राज्यांत उर्वरित प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून गुजरातमधील सर्व अमूल पार्लर आणि रिटेल आउटलेटवर सेंद्रिय पीठ उपलब्ध होईल.
जूनपासून गुजरात, दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि पुणे या महानगरांत ऑनलाइन ऑर्डर करता येणार आहे. एक किलो पिठाची किंमत ६० रुपये आणि पाच किलो पिठाची किंमत २९० रुपये आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.