Agriculture
Agriculture  Agrowon
यशोगाथा

पिकांच्या विविधेतसह घेतली पूरक व्यवसायांतही आघाडी

राजेश कळंबटे

रत्नागिरी जिल्ह्यातील वेतोशी येथे अशोक रामचंद्र साळुंखे यांनी वीस वर्षांच्या कालावधीत १९ एकर कातळ जमिनीवर मोठ्या कष्टाने नंदनवन फुलवले आहे. त्यांच्या प्रयत्नांविषयी जाणून घ्यायचं तर अशोक मूळचे पाटण (जि. सातारा) येथील. नोकरीनिमित्त १९८१ ला ते रत्नागिरीत आले. त्यांनी वेतोशी येथे जागा घेतली. लहानपणापासून गावाकडे शेतात राबल्यामुळे त्याची आवड होतीच. वेतोशीतील जमिनीत सुरवातीला दोन एकरांत जमिनीत भात लागवड (Paddy Cultivation) सुरू केली. त्यात कुशल होत आज एकरी दीड ते दोन टन उत्पादकतेपर्यंत मजल मारली आहे. इंद्रायणी, वाडा कोलम आदी वाणांचा वापर ते करतात. सुरवातीला पारंपरिक पद्धतीने शेती (Traditional Agriculture) व्हायची.

गेल्या दहा वर्षांत नवीन तंत्रज्ञानाचा ते वापर करीत आहेत. सुरवातीला पॉवर टिलर घेतला. त्यानंतर अनुदानावर टॅक्टर घेतला. जूनच्या अखेरीस भात लावणी करण्यासाठी घरगुती यंत्र विकसित केले आहे. लोखंडी सळ्यांचा वापर करून त्याच्या वरील बाजूस बियाणे ठेवण्यासाठी जागा तसेच पोकळ नळीद्वारे बियाणे जमिनीवर पडण्याची व्यवस्था केली गेली आहे. दोन वाफ्यांमधील गाळ काढण्यासाठीही यंत्र तयार केले आहे. झोडणीसाठीही यंत्राचा वापर होतो. त्यातून मजुरांची समस्या कमी केली आहे.

सेंद्रिय व्यवस्थापनावर भर

जमिनीची प्रत टिकून राहावी यासाठी घरच्या पोल्ट्रीतील कोंबडीखत वापरात आणले जाते. साधारणपणे मेमध्ये प्रति एकर १५०० किलो त्याचा वापर होतो. लावणीवेळी गांडूळ खताचा वापर केल्यानंतर पुढे रासायनिक खताचा वापर अत्यंत मर्यादित होतो. कृषी विभागाकडून होणारी शेतीविषयक विविध प्रशिक्षणे साळुंखे यांनी घेतली आहेत. गांडूळ खत निर्मितीसाठी त्यांनी ३० बाय ३ मीटरचे सात बेड तयार केले आहेत. गवत, शेणाचे पाच थर लावून त्यात गांडूळे सोडली जातात. सन २००९ पासून गांडूळ खत निर्मितीत सातत्य आहे. सुमारे २५ टन खत वर्षाला तयार होते. त्यातील १५ टन खत घरच्या शेतीसाठी ठेऊन उर्वरित खताची विक्री १५ रुपये प्रति किलो दराने होते. हापूस आंबा कलमे, भातशेती, भाजीपाला लागवडीसाठी आजूबाजूच्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडून या खताला मागणी असते.

भाजीपाला लागवड

भात कापणी आटोपली की विविध प्रकारची भाजीपाला लागवड होते. तेल उपलब्ध होण्याच्या दृष्टीने एक एकरांत भुईमूग लागवड केली आहे. टॉमेटो, पावटा, चवळी, हरभरा, कोथिंबीर, पालक, वाटाणे आदींच्या माध्यमातून पीक विविधता जपली आहे. मिरजोळे ‘एमआयडीसी’ येथे साळुंखे यांचे हॉटेल आहे. तेथे भाजीपाला उपयोगात आणला जातो.

हापूस आंब्याचे उत्पादन

नवीन लागवडीबरोबरच २५ वर्षे वयाची अशी एकूण सुमारे ६२५

हापूस आंब्याची झाडे आहेत.

त्यांचे व्यवस्थापनही सेंद्रिय पद्धतीने करण्यावरच भर असतो. दरवर्षी एकूण ३०० पेटी आंबा उत्पादन मिळते. गेल्यावर्षी सुरवातीच्या पेटीला सात हजार रुपये दर मिळाला. साधारणपणे हंगामात सरासरी दर सव्वा दोन हजार रुपयांपर्यंत मिळतो. मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात आंबा बाजारात जाण्यास तयार होतो. कातळावरील फळ असल्याने त्याला गोडीही तेवढीच आहे. मुंबई, पुण्यातील ग्राहकांना थेट विक्री करण्यावर भर आहे. खर्च वजा जाता पन्नास टक्के उत्पन्न मिळते.

कुक्कुटपालन व्यवसाय

भातशेतीबरोबरच २००९ मध्ये कुक्कुटपालन व्यवसाय सुरु केला. सुरवातीला हैदराबाद येथून ब्रॉयलर बॉयलर पक्षाची पाच हजार पिल्ले आणली. सध्या २५ हजार पक्षांचे संगोपन केले जाते. साधारणपणे पावणेदोन ते सव्वा दोन किलोचा पक्षी ४५ दिवसांत तयार होतो. पक्षांना मका, सोयाबीन खाद्य दिले जाते. शेडमध्ये उष्णता राहावी यासाठी एक हजार वॅटचे बल्ब लावण्यात आले आहेत.

वर्षाला आठ ते दहा बॅचेस घेतल्या जातात. रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे तर गोव्यातही या पक्षांना मागणी आहे. व्यापारी थेट पोल्ट्री फार्मवर येऊन कोंबडी खरेदी करतात. सुरवातीला जनता बँकेतून तीस लाखांचे कर्ज घेत उभारलेला हा व्यवसाय आता चांगले उत्पन्न देऊ लागला आहे.

कोंबड्यांचे दर सांगली, मिरज येथील व्यावसायिकांवर अवलंबून असतात. वर्षाला जेवढ्या बॅचेस घ्याल त्यातील तीन ते चार तोट्यात जाण्याचाही धोका असतो. त्यामुळे नफ्याचे गणित प्रति बॅचवर नाही तर वर्षात होणाऱ्या उलाढालीवरुन ठरते असे अशोक यांचा मुलगा पराग यांनी सांगितले.

प्रति २५ हजार पक्षांच्य बॅचसाठी सुमारे तीन ते पाच लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. शेळीपालनाची जोडही

या व्यवसायाला दिली आहे.

शेततळे व मत्स्यपालन

कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन योजनेतून एक एकरांत शेततळे उभारले आहे. त्याची खोली सुमारे ३५ फूट आहे. या तळ्याचा उपयोग मत्स्यपालनासाठीही केला आहे. मत्स्य विभागाकडून घेण्यात आलेल्या प्रशिक्षणामधून साळुंखे यांनी रूपचंद जातीच्या माशांचे उत्पादन करण्यास सुरवात केली आहे. १५ हजार बीज आणले असून पहिल्या टप्प्यात चार टन मासे मिळाले आहेत. परिसरातील ग्राहकांकडून माशांना मागणी आहे. हा मासा कोणत्याही वातावरणात टिकू शकतो. या प्रकल्पाला सौर यंत्रणेद्वारे वीजपुरवठा होतो. देखभालीसाठी एका व्यक्तीची चोवीस तास नियुक्ती केली आहे.

शेतीतून प्रगती

शासकीय नोकरीबरोबरच शेती सांभाळताना अशोक यांनी मुलांचे शिक्षणही पूर्ण केले. मोठा मुलगा तुषार ‘बीटेक’ तर परागने वकिली पदवी पूर्ण केली आहे. भविष्यात कृषी पर्यटन केंद्र म्हणून हा परिसर विकसित करण्याचा त्यांचा मानस आहे. शेतकरी ते थेट ग्राहक अशी साखळी निर्माण करण्यासाठी आमचा विशेष प्रयत्न सुरु असल्याचे पराग सांगतात.

अशोक साळुंखे- ९४२२०५४१९९

पराग साळुंखे- ९९२३८५६४२८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यातीस परवानगीची घोषणा फसवीच

Sugar Market : दर नियंत्रणासाठी साखरविक्री कोटावाढीचा केंद्राचा सपाटा

Hapus Mango Export : रत्नागिरीतून एक टन हापूस लेबनानला रवाना

Heat Wave : कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

SCROLL FOR NEXT