गादीवाफा व ठिबकवर केळीची लागवड.
गादीवाफा व ठिबकवर केळीची लागवड.  
यशोगाथा

सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती यशस्वी 

Chandrakant Jadhav

ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील शेतकरी अंशुमन गोपाल पाटील यांनी केळी, कापूस व हरभरा पेरणी व लागवडीचे अंतर वाढवून दर्जेदार व अधिक उत्पादन घेण्याचे प्रयोग यशस्वी केले आहेत. केळीची २२ ते २४ किलोपर्यंतची रास त्यांनी मिळविली. शिवाय खर्चही कमी केला आहे. हरभरा व कापसाच्या शेतीतही त्यांनी लागवड अंतरात वाढ करून चांगले उत्पादन साध्य केले आहे.  नंदूरबार जिल्ह्यात ब्राह्मणपुरी (ता. शहादा) हे गाव शहादा शहरापासून सुमारे १० किलोमीटरवर आहे. गावाकडे जाताना सुसरी मध्यम प्रकल्प लागतो. त्याच्या पाण्यासह गोमाई व सुसरी नदीच्या पाण्याचा लाभही गावाला मिळतो. केळीची शेती या भागात अधिक आहे. याच गावातील अंशुमन गोपाल पाटील यांचेदेखील केळी हेच मुख्य पीक आहे. कापूस, पपई, रब्बी हंगामात हरभऱ्याचे उत्पादन ते घेतात. सन १९९३ पासून ते शेती कसतात. सन १९९९ मध्ये शेतीच्या वाटण्या झाल्या. त्यानंतर ६० एकर काळी कसदार शेती या कुटुंबाकडे आली. यात २५ एकरांत दरवर्षी केळी असते.  केळीचे व्यवस्थापन  पाटील यांची तीन ठिकाणी शेती आहे. दरवर्षी ते उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड करतात. ज्या वर्षी शेतीच्या वाटण्या झाल्या त्या वर्षी दुष्काळी स्थितीमुळे सुमारे १२ हजार केळी झाडे करपली. त्यामुळे ती काढून टाकावी लागली. तेव्हा ठिबकचे तंत्रज्ञान फारसे प्रसारित झाले नव्हते. आता या तंत्रज्ञानासह आठ कूपनलिकांद्वारे सिंचनक्षमता तयार केली आहे.  अंशुमन सुरवातीपासून शेतीचे व्यवस्थापन पाहतात. त्यांचे लहान बंधू अमोल अभियंता असून, बंगरूळमधील एका कंपनीत व्यवस्थापक आहेत.  पाच बाय पाच फूट अंतरावर केळी रोपांची लागवड व्हायची. प्रतिरोप १२ रुपये खर्च लक्षात घेतला तर अपेक्षित रोपसंख्या व मरतूक धरून २२ हजार रुपये खर्च रोपांसाठी लागायचा. अशा अंतरात लागवड केल्यानंतर झाडांची अपेक्षित वाढ दिसत नव्हती. दाटी व्हायची. रासही १५ ते १६ किलो अशी मिळायची. मग लागवडीचे अंतर वाढवून सात बाय पाच फूट असे केले.  पूर्वी अधिक प्रमाणात लागणाऱ्या रोपांची संख्या कमी होऊन एकरी १२५० पर्यंत आली. 

व्वस्थापनातील बदल 

  • व्यवस्थापनात सुधारणा केली. आता उंच गादी वाफ्यावर लागवड होते. दीड फूट उंचीचा गादीवाफा असतो. मध्यंतरी सहा बाय पाच फूट अंतरावरील लागवडीचा प्रयोगही करून पाहिला. 
  • दरवर्षी मे महिन्यात लागवड असते. 
  • ड्रिपच्या दोन लॅटरल्समधील अंतरही सुयोग्य ठेवण्यास सुरवात केली. खतांचा वापर काटेकोर वापर सुरू केला. त्यातून त्यावरील खर्च किमान पाच हजार रुपयांनी कमी झाला. 
  • पाच बाय फूट लागवड अंतराच्या तुलनेत सात बाय पाच फूट अंतरावरील लागवडीत कापणीचे नियोजनही सुयोग्य होते. 
  • पीक फेरपालटीवर भर असतो. जेथे केळी घेतात त्या शेतात पपई, हरभऱ्याचे पीक बेवड म्हणून घेतले जाते. 
  • सुधारित तंत्राच्या वापरातून उत्पादन अर्थात रास २२ ते २४ किलोपर्यंत मिळू लागली. आज पाटील निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेतात. 
  • मागील दोन वर्षे किलोला १० रुपये दर त्यांना मिळाला आहे. 
  • नांगरणी किंवा मशागत न करताही पिके घेतली आहेत. चार एकर शेती नांगरलेलीच नाही. 
  • सन २०१२-१३ मध्ये गादी वाफ्यावर पपईची लागवड केली होती. पपईची काढणी झाल्यानंतर केवळ बेडमध्ये सुधारणा केली. केळीचा पहिला हंगाम आटोपल्यावर पिलबाग घेतला. साधारण २४ महिन्यांत केळीचा पहिला व दुसरा हंगाम घेतला. 
  • देशी कापसाची लागवड  पाटील देशी कापसाची लागवड करतात. त्याची लागवडही सात बाय एक फूट अंतरावर असते. एकरी १२ क्विंटल उत्पादन त्यात ते साध्य करतात. ही लागवडदेखील गादी वाफ्यावर असते.  २०११ पासून ते हरभऱ्याची सुधारित पद्धतीने लावण करतात. ठिबकद्वारेच हरभऱ्याला पाणी देतात. दोन ओळींमधील अंतर २० इंच असते. पूर्वी एकरी बियाणे अधिक लागायचे. आता एकरी २० ते २२ किलो बियाणे लागतात. उत्पादन एकरी १० ते १२ क्विंटलपर्यंत मिळते.  पाण्याचे संधारण  साधारण १९९९ मध्ये पाणी कमी झाल्यानंतर त्यांचे वडील गोपाल यांनी पुढाकार घेऊन सुसरी नदीवर बंधारा बांधला होता. पाण्याचा काटकसरीने वापर त्यानंतर सुरू झाला. आता जवळपास सर्व क्षेत्रावर ठिबक केले आहे. तीन वर्षांपासून शेतात डीप सीसीटीचे (सलग समतल चर) उपचार केले आहेत. सुमारे १५ एकरांत २४ डीप सीसीटी एका बांधाला बनविले. त्यातून शेतात मोठ्या प्रमाणात जलसंचय होऊ लागला आहे. जेथे शेतातील पाणी वाहून जाण्याचे आउटलेट होते त्या आसपास शेततळे तयार केले आहे. त्यात सुमारे १० लाख लिटर पाणी साठते. शेतीसाठी पाच सालगडी व एक व्यवस्थापकही आहे. नागपूर येथील गो संशोधन केंद्रात पाटील यांनी प्रशिक्षण घेतले आहे. पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमातही त्यांचा हिरिरीने सहभाग राहिला आहे. पत्नी सौ. सुषमा, चुलतबंधू अनिल पाटील, काका कै. नरोत्तम मंगेश पाटील यांची मोलाची साथ लाभल्याचे पाटील सांगतात.  संपर्क - अंशुमन पाटील - ९७६३६१२४९६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

    Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

    Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

    Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

    Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

    SCROLL FOR NEXT