नगरदेवळा (जि. जळगाव) ः केळी रोपांची पाहणी करताना नरेंद्र बिरारी.
नगरदेवळा (जि. जळगाव) ः केळी रोपांची पाहणी करताना नरेंद्र बिरारी. 
यशोगाथा

व्यवसायाचे तंत्र शेतीच्या नियोजनात ठरले फायद्याचे

Chandrakant Jadhav

नाशिक येथील फॅब्रिकेशनचा व्यवसाय सांभाळून नरेंद्र अर्जुनराव बिरारी यांनी नगरदेवळा (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील वडिलोपार्जित शेतीचे चांगले नियोजन केले. सुरवातीला नाशिक येथून नगरदेवळ्याला दर आठवड्याला ये-जा करण्याचा त्रास व्हायचा, परंतु शेती जशी यशस्वी होत गेली, नवनव्या संकल्पना सुचत गेल्या तसे त्रासाचे रूपांतर आनंदात झाले.

नरेंद्र बिरारी हे नाशिक शहरात २००३ पासून फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतात. नाशिक येथे पत्नी सौ. अनुराधा व मुलासोबत ते राहतात. नगरदेवळा (जि. जळगाव) येथे बिरारी यांची आठ एकर बागायती शेती. शाश्वत पाण्यासाठी दोन विहिरी आहेत. नरेंद्र यांचे लहान बंधू राहुल हे मुंबई येथे तेल व नैसर्गिक वायू महामंडळात कार्यरत आहे. नरेंद्र यांचे वडील अर्जुनराव बिरारी यांचे २००२ मध्ये निधन झाले. तेव्हापासून नरेंद्र यांच्याकडे शेतीची जबाबदारी आली. शेती नियोजनात काका भास्कर बिरारी आणि चुलत भाऊ किशोर बिरारी यांचे सहकार्य, मार्गदर्शन नरेंद्र यांना मिळू लागले. व्यवसायात असलो तरी शेतीची नाळ तोडायची नाही, वडिलांनी जसे प्रयोग शेतीत केले, तसेच आपणही करू, असा निर्धार असलेल्या नरेंद्र यांचा शेती विकासाचा नाशिक ते नगरदेवळा हा दोनशे किलोमीटरचा प्रवास आजही सुरू आहे. नरेंद्र दर महिन्याला किमान तीनदा गावी जाऊन पीक व्यवस्थापनाकडे लक्ष देतात. शेतीच्या दैनंदिन नियोजनासाठी एक सालगडी आणि पोल्ट्रीसाठी एक कर्मचारी आहे. या दोघांना वर्षाकाठी सुमारे दीड लाख रुपये मेहताना दिला जातो.

असे आहे पीक नियोजन 

 शेतीच्या नियोजनाबाबत नरेंद्र बिरारी म्हणाले, की आठ एकर शेतीला ठिबक सिंचन केले आहे. मी कृषी पदवीकाधारक असल्याने पीक व्यवस्थापनाची चांगली माहिती आहे. दरवर्षी तज्ज्ञांच्या सल्याने पीक व्यवस्थापनात बदल करतो. पीक फेरपालटीवर भर आहे. दरवर्षी दोन एकरांवर बीटी कपाशी लागवड असते. कपाशीचे सरासरी मला एकरी १० क्विंटल उत्पादन मिळते. खर्च वजा जाता वीस हजारांचा नफा मिळतो. गेल्या वर्षी तीन एकर केळी होती. एका क्षेत्रातील कापणी आटोपली की दुसऱ्या क्षेत्रामधील केळी उत्पादनास सुरवात होते असे नियोजन केले आहे. केळी काढणीनंतर जमिनीची नांगरट करून दुसऱ्या पिकाच्या लागवडीचे नियोजन करतो. मला सरासरी एकरी ३५ टन उत्पादन मिळते. गेल्या वर्षी केळी पिकाचा खर्च वजा जाता मला दोन लाखांचा नफा मिळाला. व्यापारी शेतावर येऊन केळी खरेदी करतात.  मी एप्रिलमध्ये दोन एकरांवर १० फूट बाय १२ फूट अंतराने साग लागवड केली. त्यामध्ये डिसेंबर महिन्यात केळीची ६ फूट बाय ५ फूट अंतराने लागवड केली. सध्या सागाची वाढ बारा फुटांची झाली आहे. मी निवडलेली सागाची जात उंच वाढणारी आणि लहान फांद्याची आहे. त्यामुळे केळीच्या वाढीवर विपरीत परिणाम होणार नाही. दुसऱ्या एक एकर क्षेत्रावर डिसेंबर महिन्यात पाच फूट बाय पाच फूट अंतराने केळी लागवड केली आहे. केळी आणि सागाला ठिबक सिंचन केले आहे. सागाची पहिली कापणी दहा वर्षांनी होईल, त्यानंतर दुसरी कापणी सहा वर्षांनी त्यापुढील कापणी चार वर्षांनी करण्याचे नियोजन आहे. सर्व पिकांना मी कोंबडीखताचा वापर करतो.  माझ्या वडिलांनी एकदा शतावरी लागवडीचा प्रयोग केला होता. त्यात त्यांना अपयश आले होते. यंदा साग लागवड करतानाही लोकांनी शंका व्यक्त केली. परंतु एक शाश्वत उत्पादन म्हणून सागाची लागवड केली आहे. सागाची गळलेली पाने शेतात कुजवितो. बांधावरही पाच बाय पाच फुटांवर साग लागवड केली आहे. केळी पिकाला शिफारशीनुसार खतमात्रा देतो. त्यामुळे आर्थिक बचत होते. केळी कापणीनंतरचे अवशेष शेतामध्ये रोटाव्हेटरने बारीक करून मिसळून देतो. सेंद्रिय घटक जागेवरच कुजल्याने सेंद्रिय कर्ब वाढीस मदत झाली. शेतीच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी एक सालगडी आहे. त्याच्या बरोबरीने नियोजन केले जाते. पीक व्यवस्थापनाबाबत परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या बरोबरीने चर्चा करतो. त्याचा पीक उत्पादनवाढीस फायदा झाला आहे.

कुक्कुटपालनाला केली सुरवात 

  •  कुक्कुटपालनाबाबत बिरारी म्हणाले, की २०१५ मध्ये पोल्ट्रीकडे वळलो. फॅब्रिकेशन व्यवसायामुळे मला पोल्ट्री शेड उभारणीसाठी सिमेंट प्लेटची संकल्पना सुचली. पाया खोदण्याचा खर्च आणि वेळ वाचवून मी सिमेंट प्लेटच्या आधारे पाच हजार कोंबड्यांसाठी शेड उभी केली. कोंबड्यांच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी एक कामगार ठेवला आहे.
  • पूर्व-पश्‍चिम शेड. रुंदी ३० फूट, लांबी २०० फूट. दोन्ही बाजूला आठ फूट आणि मध्यभागी अकरा फूट उंची. दर पाच फुटांवर पिलर, त्यामध्ये सिमेंट प्लेट बसविलेली आहे.
  • छताला वाऱ्याच्या वेगानुसार फिरणारे एक्‍झॉस्ट. यामुळे उन्हाळ्यात शेडमधील तापमान किमान तीन ते चार अंश सेल्सिअसने कमी, शेडच्या आतमध्ये फॉगर्सची गरज नाही. 
  • शेडच्या भिंती सिमेंट प्लेटच्या, यामुळे शेड उभारताना किमान दीड लाख रुपये वाचले. 
  • शेडच्या दक्षिण बाजूला डेरेदार झाडांची लागवड. झाडांमुळे शेडमधील तापमान नियंत्रणास मदत.
  •  करार पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय. लहान पिले, औषधे-उपचार सेवा, खाद्याचा कंपनीतर्फे पुरवठा. चाळीस दिवसांत कोंबडीचे वजन दोन ते अडीच किलो.
  •  एफसीआरनुसार सरासरी पाच ते सात रुपये प्रतिकिलो दर. एका बॅचमध्ये खर्च वजा जाता तीस हजारांचा नफा. वर्षभरात पाच बॅच होतात. 
  •  शेतीची सूत्रे

  • जमीन सुपीकतेवर भर, सेंद्रिय खत, कोंबडीखताचा जास्तीत जास्त वापर.
  • परिसरातील शेतकरी, तज्ज्ञांच्या बरोबरीने पीक व्यवस्थापनाची चर्चा.
  • ठिबक सिंचनातून पाणीबचत. सौर उर्जेच्या वापरावर भर.
  • व्यावसायिक तत्त्वाने शेतीचे नियोजन. किफायतशीर पीक उत्पादनाचा अभ्यास.
  •  येत्या काळात वनशेती, पूरक उद्योगावर भर.
  • संपर्क ः नरेंद्र बिरारी, ९८२२७७००६०   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

    Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

    Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

    Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

    Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

    SCROLL FOR NEXT