sampadkiya
sampadkiya 
संपादकीय

उंटावरून शेळ्या नका हाकू

विजय सुकळकर

गेल्या हंगामात राज्यात कापसावर गुलाबी बोंड अळीचा उद्रेक झाला होता. रसशोषक किडींचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणावर होता. कापसावरील कीड नियंत्रणासाठी फवारणी करताना विषबाधा झाल्याने एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २२, तर राज्यभरात ४० हून अधिक शेतकरी- शेतमजुरांना जीव गमवावा लागला होता. अनेक कीडनाशकांचे एकत्रित मिश्रण, त्यात बोगस, भेसळयुक्त कीडनाशकांचा समावेश, शिफारशीत मात्रेच्या तीन ते चारपट अधिक मात्रेने कीडनाशकांचा वापर आणि फवारणी करताना योग्य ती दक्षता न घेतली गेल्याने, हे संकट ओढवले होते. यावर्षीचा कापूस हंगाम आता तोंडावर आला आहे. परंतु राज्य शासनाचा कृषी विभाग बोंड अळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, तसेच फवारणीद्वारे होणारी विषबाधा टाळण्यासाठी कापूस उत्पादकांच्या बांधावर जाऊन अपेक्षित प्रबोधन करताना दिसत नाही. याबाबत सरकारी यंत्रणेचे केवळ आदेश देणे, तर कृषी विद्यापीठांकडूनही प्रात्यक्षिके प्रत्यक्ष प्रबोधनाएेवजी माहितीचे कोरडे डोस शेतकऱ्यांना पाजले जात आहेत.  

गेल्या वर्षीच्या विषबाधा प्रकरणानंतर या वर्षी कृषी विभागाने प्रायोगिक तत्त्वावर ड्रोनद्वारे कापसावर फवारणी करण्याचे ठरविलेले आहे. ड्रोनद्वारे फवारणीचे तंत्र आहे. परंतु हे प्रामुख्याने विदेशात वापरले जाते. अमेरिका, ऑस्ट्रेलियासारख्या प्रगत देशांत एक शेतकरी हजारो एकर शेती वाहतो. तेथे एकाच पिकाची, त्यातही एकाच जातीचे पीक सलग हजारो एकरांवर असते. त्याची एकाच वेळी यंत्राद्वारे लागवड अथवा पेरणी केलेली असल्याने ते पीक वाढीच्या एकाच अवस्थेत असते. अशा पिकावर एखाद्या किडीचा प्रादुर्भाव झाला तर तिथे ड्रोन अथवा छोट्या विमानाद्वारे फवारणी करता येते. आपल्याकडे एका ठिकाणी एका शेतकऱ्याचे चार दोन एकर कापसाचे क्षेत्र असते. शेजारी दुसरेच पीक असते. शेजारील शेतकऱ्याचा कापूस असला तरी त्याचे वाण वेगळे असते, शिवाय त्याची लागवडही वेगळ्या दिवशी झाल्यामुळे पिकाची अवस्था भिन्न असते. अशा परिस्थितीमध्ये साडेचार मिनिटांत हेक्टरभर क्षेत्रावरील फवारणी करणाऱ्या ड्रोनचा वापर आपल्याकडील लहान लहान तुकड्यांतील कापसाच्या शेतीत कितपत व्यवहार्य ठरेल, याचा विचार झालेला दिसत नाही. आयआयटी बंगळुरू येथे विकसित झालेल्या या तंत्राचे प्रात्यक्षिक दिल्लीमध्ये झाले आणि त्याचा वापर विदर्भातील कापूस उत्पादकांच्या शेतात होणार, म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचाच हा प्रकार म्हणावा लागेल. अव्यवहार्य आणि अत्यंत महागड्या तंत्रज्ञानाचे प्रयोग काहींसाठी ‘अर्थ’पूर्ण ठरू नयेत, ही काळजीही घ्यायला हवी.

आगामी हंगामात बोंड अळीला नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ‘बायो कंट्रोल’ (जैविक नियंत्रण) तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांमध्ये करणार आहे. खरे तर जैविक नियंत्रण हा एकात्मिक कीड व्यवस्थापनातील एक घटक आहे, यात नवीन असे काहीही नाही. अळीवर्गीय कीड नियंत्रणासाठी हा उपाय प्रभावी मानला जातो. कापसात प्रकाश सापळे, कामगंध सापळे लावा, ट्रायकोकार्ड वापरा, निमअर्क, जैविक बुरशीची फवारणी करा, हे वर्षानुवर्षांपासून शेतकऱ्यांना सांगण्यात येते; परंतु प्रत्यक्ष फार कमी शेतकरी त्याचा वापर करतात, हे वास्तव आहे. अशावेळी कापूस उत्पादकांना मुळात माहीत असलेल्या तंत्राचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्याकडून त्याच्या प्रत्यक्ष अवलंबाबाबत विद्यापीठाला कितपत यश येईल, हे काळच ठरवेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT