मुलींना मिळाली जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक बनण्याची संधी
मुलींना मिळाली जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक बनण्याची संधी 
मुख्य बातम्या

मुलींना मिळाली जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक बनण्याची संधी

टीम अॅग्रोवन

बुलडाणा  ः राज्यात जागतिक महिला दिनानिमित्त असंख्य कार्यक्रम, उपक्रम राबविले जातात. बुलडाणा जिल्हा प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत समाजातील मुलींमध्ये सकारात्मक प्रेरणा पोचविण्यासाठी त्यांना थेट जिल्हा प्रमुखांच्या खुर्चीवर बसून प्रशासकीय कामकाजाचा अनुभव घेण्याची संधी मिळवून दिली. कुणी जिल्हाधिकारी, कुणी जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी तर कुणी जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून कामकाजाचा अनुभव घेतला. महिला दिनाच्या अनुषंगाने हा सप्ताह राबविण्यात आला.  दररोज विविध तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील किशोरवयीन मुलींना जिल्हा मुख्यालय स्तरावरील जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या वरिष्ठ पदावर सांकेतिक स्वरूपात कारभार पाहण्याची संधी देण्यात आली. सांकेतिक स्वरूपात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी अशा प्रशासकीय पदाचा पदभार देण्यात आला होता. यासाठी समाजातील अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलींची जाणीवपूर्वक निवड करण्यात आली होती. जिल्हाधिकारी बनलेल्या पूनम देशमुख हिने संपूर्ण दिवसभर जिल्हाधिकाऱ्यांप्रमाणे विविध बैठकांना उपस्थिती लावली. जिल्हाधिकाऱ्यांना मिळणारा मान, सन्मान तिच्या वाट्याला आला. यामुळे ती भारावून गेली होती. गॅरेज मेकॅनिक अब्दुल आसिफ यांची मुलगी असलेल्या सहरिश कंवल हिला पोलिस अधीक्षक पदाची संधी मिळाली. पोलिस अधीक्षकांच्या अंबर दिव्याच्या गाडीत सहरिश कंवलचे जिल्हा पोलिस मुख्यालयात आगमन झाले. या वेळी पोलिस दलाच्या प्रचलित शिष्टाचारानुसार, पोलिस दलाच्या सशस्त्र तुकडीने सहरिश कंवलला मानवंदना दिली. वेगवेगळ्या दिवशी अशा प्रकारची प्रशासकीय कामकाजाची संधी समाजातील मुलींना मिळाली. जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या मारीया मोहम्मद आबीदला जिल्हाधिकारी बनण्याची संधी मिळाली. तर एक दिवसासाठी राखी अनिल दुरगुळे ही जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी बनली. तिला दिवसभर खुर्चीसोबतच या पदाच्या कामकाजाचा सन्मानपूर्वक अनुभव देण्यासाठी अधिकाऱ्यांनी कुठलीही कसर ठेवली नाही.   

जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून त्यांच्या कामकाजाचा अनुभव घेणे, हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस होता. मला जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या संकल्पनेमुळे थेट जिल्हाधिकारी होण्याचा मान मिळाला. मी दिवसभर प्रशासनाच्या कामकाजाचा अनुभव घेतला. मलाही भविष्यात कलेक्टरच व्हायचे आहे. त्यासाठी अभ्यास करून कठोर परिश्रम घेण्याची माझी तयारी आहे. माझ्या मोठ्या बहिणीची जिल्हाधिकारी व्हायची इच्छा होती. मात्र, कौटुंबिक परिस्थितीमुळे तिचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. मी ते पूर्ण करणार आहे.  - पूनम प्रल्हाद देशमुख, इयत्ता ८ वी, जिल्हा परिषद शाळा,  पाडळी, जि. बुलडाणा

मी एक दिवसाची पोलिस अधीक्षक बनली होती. या कामाचा अनुभव खूप मोठा आहे. मी माझ्या आयुष्यात महिला व बालकांवरील अत्याचाराला पायबंद घालून प्रत्येक मुलीला ‘होईल मी स्वयंसिद्धा़’ या ध्येयापर्यंत पोचविण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करेल. - सहरिश कंवल, इयत्ता ९ वी,  जिल्हा परिषद उर्दू शाळा मलकापूर जि. बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT