वऱ्हाडात हातातोंडाशी आलेला घास हिरावला
वऱ्हाडात हातातोंडाशी आलेला घास हिरावला 
मुख्य बातम्या

वऱ्हाडात हातातोंडाशी आलेला घास हिरावला; अवकाळीचे थैमान

टीम अॅग्रोवन

अकोला : वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तिन्ही जिल्ह्यांत मंगळवारी (ता. १७) दुपारनंतर अवकाळी पावसाने थैमान घातले. वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीट झाल्याने काढणीला आलेल्या पिकांचा पालापाचोळा झाला. पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजेनंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाली. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा, मोताळा, खामगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट तर वाशीम जिल्ह्यात मंगरुळपीर तालुक्यात काही गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी हरभऱ्याच्या आकाराची गार पडली.  खामगाव तालुक्यात आठवडाभरात दुसऱ्यांदा गारपिटीसह पाऊस झाल्याने शेतकरी अडचणीत आले. पळशी बुद्रुक परिसरात गहू, हरभरा, कांदा व भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. वसाडी, पोरज, तांदुळवाडी या भागात जोरदार पावसाने गहू, कांदा, केळी व मका पिकाचे नुकसान झाले. नांदुरा तालुक्यातील वळती, वसाडी, तरवाडी, कंडारी, शबा, टाकरखेड, खैरा, जवळा बाजार, तांदुळवाडी, शेंबा खुर्द, डौलखेड या गावांमध्ये नुकसानाचे प्रमाण मोठे आहे.  अकोला जिल्ह्यात तेल्हारा, पातूर, बाळापूर, अकोला या तालुक्यांसह अन्य ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस व सोबतच गारपीट झाली. जिल्ह्यातील हातरुण, हिवरखेड, अडगाव, देगाव, निंबा, बोरगाव मंजू, बोर्डी, झरी बाजार, वारी हुनमान, वारखेड, पिंपरखेड, खंडाळा या भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.  पातूर तालुक्यात रात्री गारपिटीसह वादळी वाऱ्याने हजेरी लावली. त्यामुळे देऊळगाव, बाभूळगाव, तुलंगा, भंडारज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा, फळपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बाळापूर तालुक्यातील हातरुण परिसरात अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील हातरुण, शिंगोली, मालवाडा, हातला आणि लोणाग्रा परिसरातही पाऊस झाला. वाशीम जिल्ह्यात मंगरुळपीर तालुक्यात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शेलुबाजार, मंगरुळपीरसह परिसरात पाऊस व गारपिटीने गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले.  प्रतिक्रिया... वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसामुळे कांदा व गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने या नुकसानीची प्रत्यक्ष शेतात पाहणी करावी. -ओमसिंग बोराडे,  शेतकरी, पोरज, जि. बुलडाणा

या वर्षी रब्बीसाठी गोसिंग शिवारातील शेतात ४ एकरात मका,२ एकर कांदा व गहू, हरभरा पेरला होता. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस, गारपिटीने माझ्या संपूर्ण पिकाचे नुकसान झाले आहे. -श्रीकृष्ण जुनारे, शेतकरी, शेंबा बुद्रूक

चार एकरात मक्याची लागवड केली होती. यासाठी आत्तापर्यंत ६० हजार खर्च केला आहे. महिनाभरात हे पीक काढावे लागले असते. मात्र, मंगळवारी झालेल्या वादळी पावसात हे संपूर्ण पीक जमीनदोस्त झाले. एकही रुपया निघण्याची चिन्हे नाहीत.  - अमोल मानकर, खैरा, जि. बुलडाणा

आठ एकरात मका पिकाची लागवड केली आहे. त्यासाठी एकरी ३० हजारांचा खर्च लागला. आधी खरिपात कपाशीचे, पावसाने नुकसान झाले. आता कालच्या पावसाने मका पूर्ण उद्ध्वस्त झाला. शासनाने याबाबत नुकसानभरपाई द्यावी. - श्रीकृष्ण शेलकर, शेतकरी, मोताळा, जि. बुलडाणा

नांदुरा तालुक्यात मंगळवारी झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश मी स्थानिक यंत्रणांना दिले. मी आज स्वतः दहा ते बारा गावात भेटी दिल्या असता तेथे मका, हरभरा, कांदा, गहू ही पिके संपूर्णतः नष्ट झालेली दिसून आली. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास या आपत्तीने हिरावून घेतला. खरिपातही अशाच प्रकारे काढणीला आलेली पिके हातातून गेली होती. रब्बीत हीच पुनरावृत्ती झाली. याबाबत मी सकाळीच कृषिमंत्र्यांसोबत बोललो. शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत मागणी केली.  -आमदार राजेश एकडे, मलकापूर विधानसभा मतदार संघ

जिल्ह्यात आठवडाभरात दुसऱ्यांदा गारपीट झाली. यात शेकडो हेक्टरवरील रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. बुधवारी मी काही गावांमध्ये पाहणी केली असता शेतकरी संपूर्णतः या संकटात उद्ध्वस्त झाल्याचे जाणवले. या सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत करून दिलासा देण्याची गरज आहे. - रविकांत तुपकर, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT