संतांच्या पालख्या पंढरीच्या वेशीवर 
संतांच्या पालख्या पंढरीच्या वेशीवर  
मुख्य बातम्या

..आली समीप पंढरी !

टीम अॅग्रोवन
भाग गेला, शीण गेला ।  अवघा झाला आनंद । प्रेमरस बैसली मिठी ।  आवडी लाठी मुखाची ।।

सोलापूर ः लक्षवेधी रिंगण सोहळे, बंधुभेटीचा अनुपम्य क्षण यांसारखे विविध अनुभव डोळ्यांत साठवत गेल्या महिनाभरापासून राज्यभरातून निघालेल्या विविध संतांच्या पालख्या पंढरपूरच्या वेशीवर वाखरीमध्ये बुधवारी (ता. १०) मुक्कामासाठी विसावल्या आहेत. आता विठुरायाच्या दर्शनाची लागलेली ओढ वारकऱ्यांना अनिवार झाली आहे. टाळ-मृंदगांचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने पालखी मार्ग दणाणून गेला आहे. दरम्यान, आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा उद्या (शुक्रवारी) होत आहे. सोहळ्यातील श्री. विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. या महापूजेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही सपत्नीक उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येते. शुक्रवारी पहाटे अडीच वाजता ही महापूजा होईल. 

आळंदीहून निघालेल्या संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह राज्यभरातील सगळ्या पालख्या बुधवारी एकाच मार्गावर आल्याने पंढरपूर-पुणे महामार्गावर भक्तीचा आगळा अनुभव प्रत्ययास येत होता. टाळ-मृदंगांचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषानाने उत्साहाला भरते आले होते. पंढरी समीप आल्याने वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील विठुरायाच्या भेटीची ओढ अनिवार झाल्याचे दिसत होते. भंडीशेगावातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने पुढे मार्गक्रमण केले. दुपारी बाजीराव विहिरीनजीक सोहळ्यातील महत्त्वाचे असे उभे रिंगण पार पडले. त्यानंतर गोल रिंगणही झाले. 

संत तुकोबाराय, संत सोपानकाका यांच्या पालख्याही या मार्गावर आल्या. आता गुरुवारी (ता. ११) दुपारी या सर्व पालख्या पंढरपुरात प्रवेश करणार आहेत. दरम्यान, पंढरपुरातही संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालख्याही दाखल झाल्या आहेत. त्यामुळे वेगळे चैतन्य पंढरीत निर्माण झाले आहे. उद्याच्या आषाढी वारीतील चंद्रभागेचे स्नान आणि विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात सुमारे चार लाखांहून अधिक वारकरी दाखल झाले आहेत. 

पंढरीत वारकऱ्यांची रीघ आषाढी वारीचा मुख्य सोहळा शुक्रवारी होणार असला तरी, बुधवारपासूनच (ता. १०) पंढरपुरात वारकऱ्यांची रीघ लागली आहे. रेल्वे, एसटी आणि खासगी वाहने पंढरपूरच्या चोहोबाजूंनी दिसत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT