Out of approved DAP allocation Not a single bag was found
Out of approved DAP allocation Not a single bag was found 
मुख्य बातम्या

औरंगाबाद : मंजूर डीएपी आवंटनापैकी एक पोतेही नाही मिळाले

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ६६३० टन डीएपी खताची मागणी नोंदविण्यात आली होती. त्या तुलनेत जिल्ह्यात केवळ ३३५५ टन जे खरीपअखेर डीएपी खत शिल्लक होते, तेवढेच उपलब्ध आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबरसाठी डीएपीचे आवंटन अनुक्रमे ९९५ व ११९३ टन मंजूर होते. त्यापैकी एक पोतेही जिल्ह्याला मिळाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी मागणीच्या तुलनेत पुरवठा झालेल्या विविध रासायनिक खतांची ७३ हजार ६९६ टन उपलब्धता आहे. युरिया व एनपीकेएस खताचा बऱ्यापैकी साठा आहे. मात्र, मागणी वाढल्यास व दोन महिन्याचा मंजूर आवंटन पुरवठाच झाला नसल्याने डीएपी खताची टंचाई भासण्याची शक्यता आहे.

यंदाच्या रब्बी हंगामासाठी औरंगाबाद जिल्ह्यात विविध खतांच्या मागणीच्या तुलनेत ८ नोव्हेंबर अखेरपर्यंत ७३ हजार ६९६ टन विविध खते आहेत. त्यामध्ये युरिया २३ हजार ३१८ टन, डीएपी २५७७ टन, एमओपी ४३०३ टन, एनपीकेएस ३० हजार १५६ टन, एसएसपी १३ हजार २९४ टन, तर कंपोस्ट खत ४६ टन उपलब्ध आहे. यंदाचा रब्बी हंगाम अतिवृष्टी व पेरणीसाठी जमीन तयार करण्यास लागणाऱ्या वेळामुळे लांबणीवर पडला आहे.

उशिराने पेरणी सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत रासायनिक खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात गंगापूर व पैठण तालुक्यात ऊस क्षेत्र पाहता खास करून डीएपी खताची मागणी वाढू शकते. त्यामुळे उपलब्ध खत साठा पाहता खताची टंचाई जाणवू शकते. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण व गंगापूर तालुक्यात डीएपी खताची मागणी वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन डीएपीच्या उपलब्धतेविषयी मागणी केली जाणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.खरीप, रब्बी हंगाम एकत्र केला, तर औरंगाबाद जिल्ह्याचे डीएपीचे अॅलोकेशन ३३५८० टन एवढे आहे. १ एप्रिल २०२१ रोजी शिल्लक खतसाठा २४२१ टन व ८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत १४५२८ टन डीएपी प्राप्त झाले. त्यामुळे एकूण १६९४९ टन डीएपी जिल्ह्याला प्राप्त झाले. म्हणजेच एकूण अॅलोकेशनच्या ५०.४७ टक्के डीएपी खत प्राप्त झाला.

आत्ता कुठे जमीन वाफश्‍यावर आली. मोसंबीला डीएपी खताची मात्रा देत असतो. परंतु डीएपी खत उपलब्ध नाही. यंत्रणेने गरज लक्षात घेऊन डीएपी खत उपलब्ध होण्यासाठी पावले उचलावीत. - प्रल्हाद गलधर, रहाटगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद.

सध्या डीएपी खत मिळेल, अशी स्थिती आहे. परंतु येत्या काही दिवसांत मागणी वाढली, तर डीएपी खताची टंचाई जाणू शकते. त्यामुळे यंत्रणेने पुढचा विचार करून डीएपी खताचे नियोजन करावे. - ईश्वर सपकाळ, तिडका, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT