jaggery
jaggery 
मुख्य बातम्या

कोरोनाच्या संकटातही गुळाचा गोडवा कायम

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : महापुराच्या तडाख्यात सापडूनही सरत्या गूळ हंगामात गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त उलाढाल झाली आहे. नुकताच गूळ हंगाम संपला असून, कोल्हापूर बाजार समितीत या हंगामात २१२ कोटी रुपयांची उलाढाल झाली. गेल्या हंगामाच्या तुलनेत या हंगामात सरासरी दरातही क्विंटलला १०० रुपयांनी वाढ झाली. ऑक्टोबरमध्ये सुरू झालेला गूळ हंगाम यंदा मे महिन्यापर्यंत चालला. अखेरच्या टप्प्यात ‘कोरोना’मुळे वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात तयार होणाऱ्या गुळाला कर्नाटक व सांगली भागातील गुळाच्या तुलनेत जादा मागणी राहिली. याचा सकारात्मक परिणाम अखेरच्या टप्प्यात गूळ दर वाढीवर झाला. महापूर येऊन गेल्यानंतर गुळाच्या उत्पादनात घट होईल असा अंदाज होता. परंतु, साखर कारखान्यांप्रमाणे गूळ हंगामही मे महिन्यापर्यंत सुरू राहिला. ‘कोरोना’मुळे सर्वत्र गूळ वाहतुकीला मोठा फटका बसला. गुळाच्या कोल्हापूर व्यतिरिक्त कर्नाटक व अन्य जिल्ह्यांतील बाजारपेठा बंद झाल्या, तसेच त्या भागातील गुऱ्हाळेही बंद राहिली. यामुळे अखेरच्या टप्प्यात गुजरातमधून कोल्हापुरी गुळाला चांगली मागणी राहिली. परिणामी दरात वाढ होती गेली. यंदाच्या हंगामात कोल्हापूर बाजार समितीत सहा लाख ३२ हजार क्विंटल गुळाची आवक झाली. यातून २१२ कोटी रुपयांची उलाढाल झाली. गुळाला सरासरी ३४०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा गुळाला समाधानकारक दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. प्रत्येक वर्षी मार्च, एप्रिलपर्यंत गूळ हंगाम चालतो. यंदा मे महिन्यापर्यंत गुऱ्हाळे सुरू होती. वेगवेगळ्या वजनाच्या २१ लाख ७ हजार ७९७ गूळ रव्यांची आवक बाजार समितीत झाली.

प्रतिक्रिया महापुरामुळे ऊस पिकाचे झालेले नुकसान पाहता यंदा गूळ उत्पादन कमी होईल, असा अंदाज होता. परंतु, यंदा गूळ आवकेत घट झाली नसल्याचे दिसले. - मोहन सालपे, सचिव, बाजार समिती, कोल्हापूर. ‘कोरोना’मुळे व्यापाऱ्यांकडे गूळ हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात कर्नाटक व इतर बाजारपेठेतून होणारी गुळाची आवक कमी राहिली. यामुळे साहजिकच शेवटच्या टप्प्यात असलेल्या कोल्हापूरच्या गूळ हंगामाला याचा फायदा झाला. व्यापाऱ्यांनी कोल्हापुरी गुळाच्या खरेदीला प्राधान्य दिले. परिणामी दरात वाढ झाली.  - निमेश वेद, गूळ व्यापारी.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT