rahuri vidyapeeth
rahuri vidyapeeth  
मुख्य बातम्या

कुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर 

टीम अॅग्रोवन

पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये कुलगुरूपदावर निवड करताना निकष बदलण्यासाठी हालचाली सुरू आहे. त्यामुळे तत्कालिन अतिरिक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील व डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी तयार केलेल्या नियमावली पुन्हा ऐरणीवर आल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. 

‘‘तत्कालिन अतिरिक्त मुख्य सचिवांनी तयार केलेले निकष योग्य आहेत. मात्र, महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातील एक लॉबी हे निकष बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. मुळ निकषात विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या उमेदवाराला प्रशासकीय व तंत्र क्षेत्रातील आठ वर्षाचा अनुभव बंधनकारक केला आहे. या निकषामुळेच विद्यापीठाला दर्जेदार कुलगुरू मिळतात,’’ असे मत शास्त्रज्ञांचे आहे. 

नानासाहेब पाटील यांच्या नियमावलीत पुढे डॉ. गोयल यांनी आणखी एक उपनियम आणला. ‘‘विभागप्रमुख किंवा समकक्ष पदांपेक्षा कमी दर्जा नसलेल्या पदांवरील किमान आठ वर्षाचा प्रशासकीय अनुभव असला तरी त्यापैकी किमान पाच वर्षांचा अनुभव हा विद्यापीठात अधिष्ठाता, संचालक किंवा समकक्ष पदाचा असावा,’’ असे या उपनियमात नमुद केले आहे. याच उपनियमाची मोडतोड करण्याचा घाट सध्या घातला आहे. 

‘‘डॉ. गोयल यांनी तयार केलेल्या उपनियमात मुद्दाम घोळ करून पाच ऐवजी तीन वर्षांचा अनुभव केल्यास अनेकांचा कुलगुरूपदाचा रस्ता खुला होईल, असा विद्यापीठातील लॉबीचा आग्रह आहे. त्यासाठी मंत्रालयात प्रशासकीय आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवर व्युहरचना करण्यात ही लॉबी गुंतली आहे,’’ अशी माहिती कृषी परिषदेच्या सूत्रांनी दिली. 

‘‘कुलगुरूपदाच्या उमेदवाराला विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ, विद्या परिषद, कार्यकारी परिषद (व्यवस्थापन मंडळ) या सारख्या सांविधिक कार्याचा अनुभव असावा, दर्जात्मक बाबी, मुल्यनिर्धारण, अधिस्विकृती प्रक्रिया हाताळण्याचा अनुभव असावा, पीएचडी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन त्याने केलेले असावे, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रीत कार्यक्रम राबविण्याचा अनुभव असावा,’’ असे २०१० च्या ‘पाटील नियमावली’त म्हटले होते. 

२०११ च्या ‘गोयल नियमावली’त उमेदवाराने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या प्रकल्पात काम केल्याचा अनुभव देखील ग्राह्य धरला गेला. तसेच, विद्यापीठात अशी पात्रता धारण केलेले उमेदवार असले तरी ते सर्व जण वैयक्तिक विचारविनिमय करण्यासाठी बोलावले जाण्याचे हक्कदार नाहीत, असेही स्पष्ट केले. 

कुलगुरू निवडीची शोध समिती तिला वाटेल अशा संख्येतच विचारविनिमयासाठी (मुलाखतीसाठी) उमेदवारांना बोलावू शकते. उमेदवाराला बोलावण्यापूर्वी उच्च दर्जा, आवश्यक अर्हता किंवा अनुभव विहीत करण्याचा अधिकार या निवड समितीला ‘गोयल नियमावली’मुळे मिळाले, असे सूत्रांचे म्हणणे आहे.  ‘डावपेचा’ची क्षमता असलेले सक्रीय  ‘‘कुलगुरू निवडीची प्रक्रिया शास्त्रशुध्द करण्याची प्रक्रिया पाटील व गोयल यांनी केली होती. मात्र, त्यातील काही भाग उचलून खटपटी करण्यात हौशी उमेदवार पुढे सरसावतात. पाटील नियमावलीत एका ठिकाणी ‘‘संबंधित उमेदवारात डावपेचात्मकदृष्ट्या विचार करण्याची क्षमता असावी,’’ असा उल्लेख आहे. हा उल्लेख शैक्षणिक व्युहरचना (अॅकेडेमिक स्ट्रॅटेजी) या संदर्भाने आहेत. मात्र, राहुरी विद्यापीठात सध्या ‘राजकीय डावपेच’ माहित असलेला एक उमेदवार बाशिंग बांधून उभा आहे,’’ अशी चर्चा उमेदवारांमध्ये आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT