cotton
cotton  
मुख्य बातम्या

कापसाचे दर ५१०० वर

टीम अॅग्रोवन

जळगावः कापसाचे उत्पादन घटल्याचा अंदाज आणि बाजारातील कमी आवक आदी बाबी लक्षात घेता मकर संक्रांतीपूर्वी खानदेशात कापसाच्या खेडा खरेदीला वेग आला आहे. कापसाचे दर प्रतिक्विंटल ५१०० रुपयांवर स्थिर आहेत. कापसाच्या खरेदीला या आठवड्यात आणखी वेग येण्याचे संकेत आहेत. 

कापसाची खेडा खरेदी सध्या जळगावमधील चोपडा, यावल, जळगाव, धरणगाव आदी भागांत बऱ्यापैकी सुरू आहे. तर धुळ्यातील शिरपूर व नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागातही ही खरेदी सुरू आहे. मकर संक्रांतीच्या सणानंतर अनेक मजूर आपापल्या गावाकडे जातात. ते आठ ते १० दिवस येत नाहीत. त्यापूर्वी कापसावर अधिकाधिक प्रक्रिया करून घेण्याचा प्रयत्न कारखानदार करतात. यामुळे मागील आठवड्यात बऱ्यापैकी कापसाची खेडा खरेदी खानदेशात झाली. जळगाव जिल्ह्यात मागील आठवड्यात प्रतिदिन सरासरी ३० ट्रक (एक ट्रक नऊ टन क्षमता) कापसाची आवक झाली. तर धुळे व नंदुरबारातही प्रतिदिन मिळून १८ ट्रक कापसाची आवक झाली. 

कापसाखालील कमाल क्षेत्र रिकामे होत असल्याची स्थिती खानदेशात आहे. त्यात मका, बाजरी व गव्हाची पेरणी शेतकरी करीत आहेत. गव्हाची पेरणी आटोपली आहे. परंतु, बाजरीची पेरणी आणखी आठवडाभर सुरू राहील. ही पेरणी जोमात सुरू असून, कापसाखालील क्षेत्र रिकामे होत असल्याने उत्पादन कमी येईल, याचा अंदाज कारखानदार, गुजरात, मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांनाही आला आहे. दुसरीकडे खानदेशात भारतीय कापूस महामंडळ व पणन महासंघातर्फे कापसाची खरेदी वेगात सुरू आहे. पणन महासंघाच्या पारोळा, धरणगाव व धुळे येथील केंद्रांत वाहनांच्या रांगा लागत असून, तेथे किमान ५३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर कापसाला मिळत आहे. यामुळे खेडा खरेदीला वेग आला असून, खरेदीदार शेतकऱ्यांना ५१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर सरसकट देत आहेत. 

कापसाची खरेदी या आठवड्यात आणखी वाढू शकते. कारखानदार कापसाचा साठा करून घेण्यावरही भर देत आहेत. कारण, सध्या वातावरण निरभ्र व कोरडेदेखील होत आहे. थंडी कमी होत असल्याने कापसामध्ये अधिकची आर्द्रतादेखील येत नसल्याची स्थिती आहे. 

सरकीचे दर स्थिर  सरकीचे दर स्थिर असून, दर्जेदार सरकीला प्रतिक्विंटल २४०० रुपयांपर्यंतचे दर मागील आठवड्यात मिळाले. यामुळे कापसाचे दरही टिकून आहेत. मध्यंतरी सरकीचे दर २१०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले होते. यामुळे कापसाची खरेदी मंदावली होती. बाजारातही अस्थिरता दिसत असल्याने खेडा खरेदी कमी झाली होती, अशी माहिती जिनींग प्रेसिंग कारखानदार अविनाश भालेराव (जळगाव) यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT