Pune News : केंद्र सरकार केवळ उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरामध्ये (एफआरपी) वाढ करीत आहे. मात्र साखरेची किमान विक्री किंमत वाढविण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे साखर उद्योगाचा भ्रमनिरास झाला आहे, अशी मत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारने एफआरपीमध्ये प्रतिटन १०० रुपये वाढ केली आहे. त्याचे संघाने स्वागत केले आहे. त्यामुळे १०.२५ टक्के उताऱ्यासाठी ३१५० रुपये एफआरपी मिळणार आहे. मात्र साखरेचा किमान विक्रीदर ३१०० रुपये इतकाच ठेवण्यात आला आहे. त्यात वाढ केली तरी जनतेचा रोष येणार नाही. कारण बाजारात ३४५० रुपयांपर्यंत दर आहेत, असे संघाचे म्हणणे आहे.
साखर संघाने दोन महिन्यांपूर्वीच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून विक्री किंमतवाढीची मागणी केली होती. विशेष म्हणजे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने देखील साखर संघाची मागणी योग्य असल्याचे व विक्री दर वाढविण्याचा निर्णय योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असे संघाला कळविले आहे. साखरेचे किमान विक्री दर वाढविण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी केली आहे.
साखर संघाच्या म्हणण्यानुसार, केंद्र व राज्य सरकार साखर कारखान्यांना मदत करते. त्यासाठी कर्ज किंवा व्याजसवलत योजना उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र त्यातून कारखान्यांवरील आर्थिक देणी अजून वाढत जातात. परिणामी, कारखान्यांचे ताळेबंद विस्कळीत होतात.
कर्जमर्यादा संपल्याचे सांगत पुढील हंगामासाठी नवी कर्जे देण्यास बॅंका नकार देतात. त्यासाठीच साखरेचा विक्रीदर किमान ३७२० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढवायला हवा. तसे केले तरच कारखान्यांना आपापले प्रक्रिया व इतर खर्च भागवून साखर उत्पादन करणे चालू ठेवता येईल.
...असा बिघडतो साखर कारखान्यांचा ताळेबंद
सध्या साखरेचा विक्रीदर केवळ ३१०० रुपये आहे. त्यातून १५ टक्के म्हणजेच ४६५ रुपये इतके ‘मार्जिन मनी’ वगळल्यास साखरेवर बॅंका प्रतिक्विंटल केवळ २६३५ रुपये तारण कर्ज देतात. त्यातून पुन्हा प्रक्रिया खर्च व मागील कर्जाचा हप्ता मिळून ७५० रुपये कापले जातात.
त्यामुळे एफआरपी देण्यासाठी कारखान्यांच्या हाती केवळ १८८५ रुपये उरतात. यामुळे चालू हंगामातील एफआरपी देण्यासाठी कारखान्यांकडून १२६५ रुपये कमी पडत आहे. यामुळे कारखाने आर्थिक अडचणीत येतील, असे संघाचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.