सीताफळावरील फळमाशी व तिने केलेले नुकसान
सीताफळावरील फळमाशी व तिने केलेले नुकसान  
ॲग्रो गाईड

सीताफळावरील फळमाशीचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण

डॉ. सुनील लोहाटे, डॉ. गणेश बनसोडे

सीताफळ पिकावर सद्यःस्थितीत फळमाशी या किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. फळमाशीची अळी अवस्था फळाच्या आत असल्यामुळे रासायनिक कीटकनाशके फळात पोचू शकत नाहीत. त्यामुळे नियंत्रणासाठी एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.

फळमाशीच्या ४०० हून अधिक जाती आहेत. त्यातील बऱ्याचशा जाती फळे आणि वेलवर्गीय पिकांवर आढळतात. त्यामुळे फळमाशीचे वर्षभर अस्तित्व आढळते. झाडांना जेव्हा फळे असतात तेव्हा तिचे प्रमाण जास्त असते.

जीवनचक्र : फळमाशी पिवळसर सोनेरी रंगाची असते. आकाराने नरमाशीपेक्षा मादी थोडी मोठी असते. काढणीस तयार  झालेल्या फळांच्या सालीखाली ती पुंजक्‍यात अंडी घालते. एका पुंजक्‍यात सुमारे १००-३०० अंडी असतात. अळी फिक्कट पांढऱ्या रंगाची व डोक्‍याकडे निमुळती होत जाणारी असते. अळी अवस्था १० ते १५ दिवसांची असते. पूर्ण वाढलेल्या अळ्या जमिनीत कोषावस्थेत जातात. कोषावस्था ८ ते १२ दिवसांची असते. कोषामधून प्रौढ कीटक बाहेर येऊन पुन्हा अंडी देतात. अशा प्रकारे वर्षात ७ ते ८ पिढ्या पूर्ण होतात.

नुकसान :  फळातील गरावर अळी उपजीविका करते. त्यामुळे फळे कुजतात आणि गळून पडतात. प्रादुर्भावग्रस्त फळांची गुणवत्ता कमी होते. ती खाण्यायोग्य राहत नाहीत. नियंत्रण :  अळी अवस्था फळाच्या आत असल्यामुळे फवारणीनंतरही रासायनिक कीटकनाशके अळीपर्यंत पोचू शकत नाही. तसेच फळाच्या काढणीनंतर अल्पावधीतच त्यांची विक्री आवश्‍यक असल्यामुळे कीटकनाशकाचा विषारी अंशही फळात शिल्लक राहतो. त्यामुळे सामूहिक स्तरावर एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापनाचा अवलंब हाच उपाय प्रभावी ठरतो.

एकात्मिक नियंत्रण :

  • फळे पक्व होण्याआधी काढावीत. 
  • पक्व झालेली फळे गळून बागेत पडतात. त्यामुळे फळमाशीची उत्पत्ती वाढते. हे टाळण्यासाठी खाली पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.
  • फळमाशीची कोषावस्था जमिनीत असते. मातीत ती २-३ सें.मी. खोलीपर्यंत आढळते. त्यामुळे फळबागेतील माती वेळोवेळी हलवून घ्यावी. जेणेकरून कोष उघडे पडून सूर्यकिरणे व पक्षांद्वारे त्यांचे नियंत्रण होते.
  • तुळशीमधील मिथाईल युजेनॉल या रसायनाकडे फळमाशी आकर्षित होते. त्यामुळे बागेच्या मध्ये तसेच कडेला तुळशीची झाडे लावावीत.
  • फळमाशीच्या तोंडाच्या अवयवांची रचना अशी असते, की ज्यामुळे तिला केवळ द्रवरूप स्वरुपातील पदार्थच खाता येतात. त्यामुळे फळमाशीच्या नियंत्रणासाठी विषारी अामिषाचा उपयोग करावा. विषारी अामिष तयार करताना गुळपाणी १ लिटर अधिक मॅलॅथिऑन (५० टक्के ई.सी.) २ मि.लि. अधिक मिथाईल युजेनॉल ५ मि.लि. या प्रमाणात द्रावण तयार करून त्याचा वापर करावा. विषारी अमिषाकडे फळमाश्या आकर्षित होऊन त्यांचा नायनाट होतो. अामिषाचा उपयोग बागेच्या कडेने तसेच झाडांवर अशा पद्धतीने एकरी २० या प्रमाणात करावा.
  • विशेषत: नर माश्‍यांच्या नियंत्रणासाठी मिथाईल युजेनॉल चार ते पाच थेंब (५ मि.लि.) अधिक मॅलॅथिऑन (५० टक्के ई.सी.) चार ते पाच थेंब (५ मि.लि.) कापसाच्या बोळ्यावर टाकून ते प्लास्टिकच्या डब्यात ठेवावेत. प्रतिहेक्‍टरी असे ४ सापळे लावावेत. नर फळमाश्या या सापळ्याकडे आकर्षित होऊन त्यात पडून मरतात. दर १५ ते २० दिवसांनी रसायने बदलून मेलेल्या माश्या सापळ्यातून काढून टाकाव्यात. सापळा ४-५ फूट उंचीवर टांगावा. 
  • बहर धरण्यापूर्वी तसेच फळे लिंबाच्या आकाराची झाल्यावर हेक्‍टरी ४-५ रक्षक सापळे लावावेत. 
  • सापळे लावल्यामुळे बागेतील नर फळमाशीचे प्रमाण कमी होते. मादी माशीला मिलनासाठी नरांची उपलब्धता कमी होते. परिणामी मादी नराच्या शोधात अन्य ठिकाणी जातात किंवा अंडी फलीत न होण्याचे प्रमाण वाढते.
  • संपर्क : डॉ. सुनील लोहाटे, ९४२२०७१०२८ (राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

    Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

    Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

    Indian Farmer : बळीराजा जागा हो...

    Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

    SCROLL FOR NEXT