wheat crop
wheat crop 
ॲग्रो गाईड

पीकनिहाय आवश्यक अनुकूल तापमान

डॉ. कैलास डाखोरे

महाराष्ट्र राज्य हवामानाच्या समतिशोष्ण या प्रकारात मोडत असून, तीन ऋतूमध्ये आणि सामान्य: नऊ कृषी हवामान विभागात विभागलेले आहे. राज्याच्या विविध विभागामध्ये पर्जन्यमानाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते.

महाराष्ट्र हे भौगोलिक क्षेत्रानुसार देशात तिसऱ्या क्रमांकाचे राज्य असून, १६० अक्षांश उत्तर ते २२० अक्षांश उत्तर आणि ७२.८० रेखांश पूर्व दरम्यान वसलेले आहे. महाराष्ट्र राज्य कोकण किनारपट्टी, सह्याद्री रांगा (पश्चिम घाट) आणि दख्खनचे पठार या तीन विभागात विभागलेले आहे. महाराष्ट्र राज्य हवामानाच्या समतिशोष्ण या प्रकारात मोडत असून, तीन ऋतूमध्ये आणि सामान्य: नऊ कृषी हवामान विभागात विभागलेले आहे. राज्याच्या विविध विभागामध्ये पर्जन्यमानाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते. घाट आणि किनारपट्टी यांच्या अंतर्गत असलेल्या जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमान २००० मि.मी. असून महाराष्ट्र राज्याचा काही भाग पर्जन्यछायेच्या अंतर्गत येतो. तेथील पर्जन्यमान सरासरी ६०० ते ७०० मि.मी. पर्यंत असते. महाराष्ट्र राज्यात ५०० ते ३००० मि.मी. यादरम्यान पर्जन्यमान होत असून, वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ही १००० मि.मी. आहे. ६० ते ७० पर्जन्यदिवस आहेत.  राज्यात भात, बाजरी, गहू, तूर, मूग, उडीद, हरभरा  लागवड आहे. तेलवर्गीय पिकात सूर्यफूल, भुईमूग आणि सोयाबीन तर नगदी पिकात कापूस, ऊस, हळद आणि भाजीपाला पिके घेतली जातात. महाराष्ट्र राज्याचा सरासरी १०.९१ लाख हेक्टर क्षेत्र फळपिकांच्या लागवडीखाली आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी ६० टक्के क्षेत्र हे अन्नधान्य पिकाच्या लागवडीखाली आहे. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३०७.५८ लाख हेक्टर आहे. एकूण पिकाखालील क्षेत्र हे २२५.५६ लाख हेक्टर आहे. यापैकी १४१.९४ लाख हेक्टर क्षेत्र हे कोरडवाहू आहे. शेतीचे लहान लहान तुकड्यात विभागणी होऊन अल्पभूधारक आणि सीमांत (लहान) शेतकऱ्यांचे प्रमाण ६८ टक्के आहे.

अनुकूल तापमान गहू 

  •  रब्बी हंगामातील मुख्य पीक. पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी आवश्यक तापमान ः 
  • उगवणीच्या कालावधीमध्ये कमाल तापमान ३१ ते ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १२ ते १९ अंश सेल्सिअस.
  • ओंबी धरण्याच्या  कालावधीमध्ये कमाल तापमान २४ ते ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान ५ ते १७ अंश सेल्सिअस.
  •  परिपक्व होण्याच्या कालावधीमध्ये कमाल तापमान २७ ते ३७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान ९ ते १९ अंश सेल्सिअस. 
  • फुले लागणे ते परिपक्व होणे हा कालावधी महत्त्वाचा आहे. या कालावधीत जमिनीतील ओलावा चांगला असल्यास चांगली वाढ होते. उत्पादनात वाढ होते. 
  • हरभरा

  • कडधान्यवर्गीय मुख्य पीक. उत्तम वाढीसाठी अनुकूल तापमान ः 
  •  उगवणीच्या कालावधीमध्ये कमाल तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस. 
  • फुलधारणेच्या कालावधीमध्ये कमाल तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६ ते २० अंश सेल्सिअस. 
  • घाटे लागण्याचा कालावधीमध्ये कमाल तापमान २९ ते ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५ ते २० अंश सेल्सिअस. 
  •  हरभरा पिकाचा फुले लागणे ते घाटे लागणे हा कालावधी महत्त्वाचा आहे. या कालावधीमध्ये जमिनीतील ओलावा चांगला असल्यास उत्पादन चांगले मिळते. जमिनीतील ओलावा कमी झाल्यास पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे आढळून आले आहे.  
  • रब्बी ज्वारी 

  •  तृणधान्य वर्गातील मुख्य पीक. रब्बी हंगामातील या पिकाच्या उत्तम वाढीसाठी अनुकूल तापमान 
  •  उगवणीच्या कालावधीमध्ये कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस.
  •  फुलधारणेच्या कालावधीमध्ये कमाल तापमान ३० ते ३२ अंश  सेल्सिअस तर किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअस.
  • परिपक्वतेच्या कालावधीमध्ये कमाल तापमान २९ ते ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान ११ ते १६ अंश सेल्सिअस. 
  •  फुले लागणे ते दाणे भरणे हा कालावधी महत्त्वाचा आहे. या कालावधीमध्ये जमिनीतील ओलावा चांगला असल्यास उत्पादन चांगले मिळते. जमिनीतील ओलावा कमी झाल्यास पिकाच्या उत्पादनात मोठया प्रमाणात घट झाल्याचे आढळून आले आहे.  
  • व्यवस्थापनाची सूत्रे

  • येत्या काळात  रब्बी हंगामातील तापमानामध्ये वाढ होत जाणार आहे. अशा वेळी अधिक तापमानात तग धरतील अशा पिकांच्या जातींची पैदास करणे, संशोधन करणे आवश्यक आहे. अशा जाती उपलब्ध असल्यास त्यांची शेतकऱ्यांनी निवड करावी. 
  •  हवामान बदलानुसार पीक पध्दतीचा वापर करावा. 
  •  जमिनीतून होणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. अशा पद्धतीने पाणी व्यवस्थापन केल्यास पाणी बचत होऊन उत्पादनात वाढ होते. 
  • सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करावा. 
  • जमिनीतील उपलब्ध ओलावा पिकांची अवस्था व तेथील हवामान या मुद्द्यांचा सखोल विचार करून पाण्याच्या पाळ्यांमधील अंतर ठरवून पाणी द्यावे. पिकांना व फळ बागेला पाणी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी द्यावे.
  •  पीक फुलोऱ्यावर असताना व फळांची वाढ होत असताना नियमित पाणीपुरवठा आवश्यक असतो. या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुलगळ, फळधारणा न होणे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात. यामुळे या काळात पाण्याचे योग्य नियोजन करावे. 
  •  उष्णता वाढल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होऊन पिकांचीही पाण्याची गरज वाढते, यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करून पिकांना पाणी दयावे. 
  •      रूंद वरंबा - सरी पद्धतीने पेरणीचे नियोजन 

  • रूंद वरंबा - सरी  (बीबीएफ) टोकणयंत्राने पेरणी करावी. पावसाचे अतिरिक्त पाणी वाहून न जाता सरीमध्ये साठून राहून तेथेच मुरते. जमिनीची धूप होत नाही. शिवाय, पावसात दीर्घ मुदतीचा खंड पडला तरी सरीत मुरलेल्या पावसाच्या अतिरिक्त पाण्याची ओल मिळते. पिकाला पाण्याचा ताण सहन करावा लागत नाही. तसेच पावसाचे अतिरिक्त पाणी पिकात न साचता सरीत साठल्याने पीक पिवळे पडून उफळण्यापासूनच वाचते. 
  •  पेरणीसाठी रुंद वरंबा - सरी टोकण यंत्र उपलब्ध नसल्यास पिकाच्या पेरणीनंतर तीन ते चार आठवड्यांत रिजर किंवा बळीराम नांगराच्या साहाय्याने प्रत्येक तीन ते चार ओळीनंतर सरी काढावी. या सरीचा रुंद वरंबा - सरी टोकण यंत्राच्या सरीप्रमाणेच उभ्या पिकात मूलस्थानी जलसंधारणासाठी उपयोग होईल. 
  •  या पद्धतीमुळे चांगली मशागत होऊन चांगल्या प्रकारे गादीवाफा तयार होतो. पाणी व हवा यांचे प्रमाण राखले जाते. पिकांची उगवण चांगली होऊन वाढ जोमदार होते. बऱ्याच वेळा सततच्या पावसात साचणाऱ्या पाण्यामुळे होणारे नुकसान टाळता येते. 
  •  रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये बियाण्याचे योग्य प्रमाण बियाण्याची योग्य खोली व अंतरावर पेरणी करता येते. त्याचबरोबर खतांची पेरणीही करता येते. 
  •  पिकांच्या मुख्य वाढीच्या अवस्थेमध्ये पावसाने दीर्घकाळ उघडीप दिल्यास किंवा तापमानात वाढ झाल्यास बाष्पीभवनाचा दर वाढतो. तो कमी राखण्यासाठी योग्य त्या आच्छादनाचा वापर करावा. बाष्परोधकाची फवारणी करून बाष्पोत्सर्जनाचे प्रमाण कमी करता येते. 
  •  दीर्घकाळ पावसाने उघडीप दिल्यास सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करून पाणी व्यवस्थापन करावे.
  • -  डॉ. कैलास डाखोरे, ९४०९५४८२०२   (अखिल भारतीय समन्वयीत कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

    Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

    Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

    Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

    Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

    SCROLL FOR NEXT