द्राक्षपिकात स्टेम गर्डलर बीटलची समस्या
द्राक्षपिकात स्टेम गर्डलर बीटलची समस्या 
ॲग्रो गाईड

स्टेम गर्डलर बीटलसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन उपयुक्त

तुषार उगले, अशोक मोची, कांचन शेटे

सध्या द्राक्ष पट्ट्यात खोडास रिंग करून नुकसान पोचवणाऱ्या भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. नाशिकसह लातूर, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर, नगर, जालना भागांतील द्राक्ष बागांमध्ये प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येत आहे. सध्या खोड किडीबरोबरच या किडीच्या नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना उपलब्ध नाही, त्यामुळे एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब उपयुक्त ठरू शकेल.

स्टेम गर्डलर बीटल म्हणजे खोडास चक्राकार पद्धतीने नुकसान करणारा भुंगा होय.  शास्रीय नाव ः स्थेनियास ग्रायसेटर  कुळ ः सेराम्बीसिडी  वर्ग ः कोलिओप्टेरा या किडीचा भुंगेरा वर्गीय गडद तपकिरी - काळपट रंगाचा असतो. त्याच्या पाठीवरील पंखाच्या जोडीमध्ये एक काट्यासारखा भाग असतो. पंखावर पांढरट-राखाडी ठिपके असतात. द्राक्षाशिवाय ही कीड सफरचंद, संत्रावर्गीय फळझाडे, आंबा तसेच काही जंगली वनस्पतीवरही नुकसान करताना आढळते.

जीवनचक्र

  •  झाडास रिंग करून जखम केलेल्या ठिकाणी मादी भुंगेरा २ ते ४ अंडी घालते.
  •  साधारणपणे आठ दिवसांत अंड्यातून बारीक अळ्या निघतात. त्या जखमेतून खोडात प्रवेश करतात. ही कीड खोड किडीप्रमाणेच खोडातील आतला भाग पोखरून नुकसान करते. खोडातील आतील भाग पोखरून संपूर्ण अळी अवस्था खोडातच पूर्ण होते. त्यानंतर अळी खोडातच कोषावस्थेस जाते.
  •  प्रौढ ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात कोषावस्थेतून बाहेर पडतात. पुन्हा खोडास जखम करून प्रादुर्भाव सुरू करतात.
  •  साधारणपणे या किडीची एका वर्षात एक पिढी तयार होते.
  •   नियंत्रण  

  • पूर्वी या किडीचा प्रादुर्भाव खूप कमी होता. मात्र, अलीकडे तो वाढत असल्याचे दिसत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा.
  •  प्रौढ भुंगेरे कोषावस्थेतून बाहेर पडल्यावर रात्रीच्या वेळी प्रकाशाकडे आकर्षित होतात. बागेमध्ये प्रकाश सापळे लावावेत.
  •  या किडीचा प्रादुर्भाव रात्रीच्या वेळी आढळतो. अंधार पडल्यावर बागेत चक्कर मारून बागेतील प्रादुर्भावचा अंदाज घ्यावा. शक्य असल्यास प्रौढ भुंगेरे हाताने गोळा करून, कीटकनाशक  द्रावणात टाकून नष्ट करावेत.
  •  गर्डलिंग केलेल्या ठिकाणी जखमेजवळ अंडी घातलेली असतात, असे प्रादुर्भावग्रस्त खोड ओलांडे कापून नष्ट करावेत.
  •  अंड्यातून निघालेल्या बारीक अळ्या अशा प्रादुर्भावग्रस्त खोडातच घुसून प्रादुर्भाव करतात. रासायनिक कीटकनाशक किंवा निमयुक्त वनस्पतीजन्य द्रावण मिश्रित कापड खोडावरील अशा जखमेवर गुंडाळावा. अशा ठिकाणी मादी अंडी घालणार नाही. तसेच नुकत्यात घातलेल्या अंड्यातून निघालेल्या अळ्यांचेही नियंत्रण होऊ शकेल. रासायनिक कीडनाशकांचा वापर द्राक्ष बागेतील लेबल क्लेम आणि काढणीपूर्व प्रतीक्षा कालावधी यानुसारच करावा. यासाठी भुंगेरावर्गीय प्रौढ किडींच्या नियंत्रणासाठी असणाऱ्या स्पर्शजन्य कीटकनाशकांचा वापर करता येईल.
  •  कीटकनाशकांची धुरळणीदेखील फायद्याची ठरू शकते, मात्र यासाठी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
  •  खोड-ओलांड्यास झालेल्या जखमेच्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावी किंवा गेरू मिश्रित कीटकनाशक लावावे. यामुळे अंडी घालण्यास प्रतिबंध करता येईल. पुढील हंगामातील प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल.
  •  ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात प्रौढ भुंगेरे दिसू लागताच बागेमध्ये जैविक कीडनाशकांचा उदा. बिव्हेरिया बॅसियाना, मेटारायझिम ॲनिसोप्ली यांचा फवारणीद्वारे वापर करता येईल. त्यासाठी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्‍यक राहील. पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे ही जैविक कीडनाशके नियंत्रणाचे चांगल्याप्रकारे कार्य करतात.
  •  या किडीविषयी सातत्याने जागरुकता निर्माण करण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी अनुभवी बागायतदारांनी पुढाकार घ्यावा. त्यातून बागेतील प्रादुर्भाव वेळेतच लक्षात आल्यास भविष्यातील नियंत्रण सोपे होऊ शकेल.
  • संपर्क ः तुषार उगले, ९४२०२३३४६६

    (सहायक प्राध्यापक, कीटकशास्र विभाग, के. के. वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

    Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

    Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

    Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

    Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

    SCROLL FOR NEXT