Baramati News : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त सभा, प्रचारफेऱ्या आदींसाठी गर्दी जमवण्यासाठी महिला-पुरुषांची मोठी मागणी वाढली आहे. दिवसाला सहाशे ते आठशे रुपये, सकाळचा नाष्टा व दोन वेळेचे जेवण मिळत असल्याने बेरोजगार तरुण, शेतमजूर सध्या उमेदवारांइतकेच प्रचारात व्यग्र आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आहे.
समाधानकारक पावसानंतर पाण्याची उपलब्धता जिरायती भागातसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे साहजिकच रब्बी हंगामामध्ये शेतातली कामे सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तसेच इंदापूर बारामतीच्या काही भागांमध्ये द्राक्ष बागांचा हंगाम देखील सुरू झाला आहे. अशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे इंदापूर बारामती या दोन्ही तालुक्यांतील गावोगावी होणाऱ्या प्रचारफेऱ्या, सभा, बैठका यासाठी उमेदवार गर्दी असावी, अशी अपेक्षा व्यक्त करतात.
कार्यकर्त्यांकडून देखील गर्दी जमविण्यासाठी अपार मेहनत घेतली जात आहे. त्यासाठी ठेकेदारी पद्धतीने माणसे पुरवणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला जातो. दिवसभर प्रचार असेल तर प्रतिमाणसी सहाशे ते आठशे रुपये हजेरी, सकाळचा नाष्टा व दोन वेळचे जेवण देण्यात येते.
फक्त सभेला गर्दी करायची असेल तर तीनशे ते पाचशे रुपये व एक वेळचा नाष्टा देण्यात येत आहे. शेतात काम करण्यासाठी सकाळी दहा ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महिलांना ३०० ते ४००, तर पुरुषांना ६०० ते ७५० रुपये मिळतात. आतापर्यंत अनेक मजूर शेतात कामासाठी सहज उपलब्ध होत होते. मात्र, निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचाराला गर्दी जमविण्याची गरज निर्माण झाली. अशा वेळी सहज उपलब्ध असलेल्या मजुरांनाच मो
ठी मागणी आली आहे.
‘लाडकी बहीण’मुळे महिलांना मागणी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना आणली होती. या योजनेमुळे महिलावर्गाची मते आपल्याकडे वळतील असा सत्ताधाऱ्यांना अंदाज होता. विरोधकांनी देखील महिला वर्गाला आकर्षित करण्यासाठी जाहीरनाम्यामध्ये घोषणा केल्या. त्यामुळे अनेक उमेदवार प्रचारानिमित्त महिला मेळावे घेत आहेत. या महिला मेळाव्यांना देखील महिलांची गर्दी दिसावी यासाठी गावोगावी गाड्या पाठवल्या जातात. मेळाव्याला हजेरी लावणाऱ्या महिलांना तीनशे ते पाचशे रुपये रोज दिला जातो.
शेतमजुरी आमचा कायमस्वरूपी व्यवसाय आहे. वीस तारखेनंतर तो सुरूच राहणार आहे. मोठमोठे नेते अशा निवडणुकांमध्ये खर्चाचा विचार करत नाहीत. आम्ही आमचा घर प्रपंच भागवण्यासाठीच या प्रचार फेऱ्यांमधून फिरतो. मिळणारे पैसे उडवत नाही तर पुढील कामासाठी जपून ठेवतो. निवडणुकांचा हंगाम आमच्यासाठी सुद्धा एक प्रकारचा व्यवसाय आहे.- एक शेतमजूर, लासुर्णे, ता. इंदापूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.