Gokul Milk Sangh agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Doodh Sangh : गोकुळ दूध संघाला साडेअकरा कोटी रुपयांचा नफा

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा दूध संघास (गोकुळ) यंदा ११ कोटी ६६ लाख रुपयांचा नफा झाला आहे. सभासदांच्या विश्‍वासाच्या जोरावर संघाची वाटचाल सुरू असून भविष्‍यात दूध उत्पादकांसाठी विविध योजना आखण्यात आल्याची माहिती दूध संघाचे अध्‍यक्ष अरुण डोंगळे यांनी शुक्रवारी (ता. ३०) येथे दिली.

संघाच्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. दरम्‍यान, संघाच्या सभेत प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही विरोधी गटाच्या सभासदांनी गोंधळ घालून विषय नामंजुरीच्या घोषणा दिल्या. या घोषणांमध्ये तब्बल दीड तास श्री. डोंगळे यांनी भाषण करत सभा सुरू ठेवली.

श्री डोंगळे म्‍हणाले, ‘‘संघाची वार्षिक उलाढाल ३ हजार ६७० कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. ही उलाढाल गेल्या वर्षीच्या तुलनेत २४१ कोटी रुपयांनी अधिक आहे. ७६ कोटी २४ लाख रुपयांचे भाग भांडवल आहे. संघाने म्हशीच्या दुधासाठी प्रति लिटर सरासरी ५८ रुपये ५४ पैसे व गायीच्या दुधासाठी ३८ रुपये ३७ पैसे दर दिला आहे.

हा दर राज्यात सर्वाधिक आहे. शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा हा दर ५ ते ७ रुपयांनी जादा आहे. संघाच्‍या एकूण उत्पन्नातील ८१ टक्के रक्कम संघाने दूध उत्पादकांना परतावा म्‍हणून दिली आहे. वैरण बॅंकेची स्थापना करून चाराटंचाई कमी करण्याला प्राधान्य दिले आहे.

दूध पावडर व लोण्याच्या शिल्लक साठ्यामध्ये ४,१४७ टनाने वाढ झाली आहे. या वर्षभरात १२९ कोटी रुपयांची गुंतवणूक स्व भांडवलातून केली आहे. दूध उत्पादकांसाठी भविष्य कल्याण योजनाही सुरू आहेत.

भविष्यामध्ये मुंबईनजीक भोकरपाडा येथे १५ एकर जमीन खरेदी करणे, वाशी येथे १५ टन क्षमतेचा दही प्रकल्‍प उभारणे, दररोज ४ लाख लिटर पाण्याचा पुनर्वापर करून पाण्याचा खर्च कमी करण्याबाबतचा प्रकल्प आदींसह दूध पावडरीचे विविध देशांत निर्यात नियोजन या बाबी विचाराधीन असल्याचे सांगितले. कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी अहवाल वाचन केले. या वेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्यासह संचालक उपस्‍थित होते.

राजकीय ईर्षा कायम

दूध संघाच्या सभेत विषयांपेक्षा राजकीय खुन्नस पाहायला मिळाली. सत्ताधारी व विरोधी गटाच्या सभासदांनी एकमेकांविरोधात पोस्टरबाजी करीत एकमेकांविरोधी घोषणा दिल्या. दोन तास सभा चालली. यात दोन्ही बाजूंनी अखंड घोषणाबाजी होत राहिली. गोकुळमार्फत पशुवैद्यकीय डेअरी टेक्नॉलॉजी कॉलेज सुरू करण्याबाबतच्या विषयाची सभेत जोरदार चर्चा झाली. विरोधी संचालक शौमिका महाडिक व अन्य सभासदांनी याला विरोध करीत नामंजुरीच्या घोषणा दिल्या. याबाबत समांतर सभा घेऊन कॉलेज उभारणीला आमचा विरोध आहे. जे विद्यार्थी हा अभ्यासक्रम करू इच्छितात त्‍यांना शिष्यवृत्ती द्या, पण कॉलेजला आमचा विरोध राहील असे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT