Team Agrowon
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात आत्मनिर्भर तेलबिया अभियानाची घोषणा केली. मोहरी, भुईमूग, तीळ, सोयाबीन, सूर्यफुलासारख्या तेलबियांचे उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट आहे.
सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. पण सरकारने केवळ घोषणेपुरते न थांबता प्रत्यक्षात या अभियानाची अंमलबजावणी करून त्यासाठी पुरेसा निधी दिला तरच फायदा होईल, असे मत शेतकरी आणि उद्योग क्षेत्रातून व्यक्त करण्यात आले.
भारत सध्या खाद्यतेलासाठी आयातीवर अवलंबून आहे. एकूण गरजेच्या तब्बल ६० टक्के खाद्यतेल देशाला आयात करावे लागते.
त्यासाठी विदेश चलनही खर्च करावे लागते. चालू आर्थिक वर्षात खाद्यतेल आयातीवर १ लाख ४० हजार कोटी रुपये खर्च झाला असावा, असा अंदाज आहे.
त्यामुळे सरकार मागील काही वर्षांपासून देशातील तेलबिया उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत आहे. उद्योगांनीही देशातील तेलबिया उत्पादन वाढीसाठी योजना राबविण्याची मागणी रेटून धरली आहे.