Team Agrowon
गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात हलक्या सरी बरसत आहेत. काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे भात लागवडीला सुरवात झाली आहे.
आत्तापर्यंत भाताच्या ५९ हजार ६२७ हेक्टरपैकी २२४ हेक्टरवर भात लावणी झाली आहे. अशीच स्थिती राहिल्यास येत्या काळात भात लागवडीला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
जूनच्या सुरवातीला जिल्ह्याच्या भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, पुरंदर, हवेली या तालुक्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी भात रोपे टाकली होती.
काही शेतकऱ्यांची एसआरटी पद्धतीने लागवडीसाठी लगबग सुरू झाली होती. लवकरच चांगला पाऊस होईल, म्हणून या आशेने शेतीकामांनी वेग घेतला होता.
काही प्रमाणात भात लागवडी झाल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. मागील काही दिवसांपासून भात पट्ट्यातील तालुक्यांत जोरदार पाऊस पडला. त्यामुळे भात खाचरे भरली.
धरणांतील पाणीपातळीतही वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा भात लागवड करण्यास सुरवात केली आहे.