Team Agrowon
देशातील ६३ टक्के महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असून, आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याची आणि स्वावलंबी होण्याची आस असल्याचे निरीक्षण एका सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पेनियरबाय फिनटेक कंपनीने त्यांच्या रिटेल दालनात देशभरातील ५००० महिलांच्या आर्थिक व्यवहारांचे निरीक्षण करून पेनियरबाय विमेन फायनान्शियल इंडेक्स (पीडब्ल्यूएफआय) अहवाल तयार केला आहे.
या सर्वेक्षणानुसार, ५५ टक्के महिलांना आर्थिक बाबींशी संबंधित विविध सरकारी योजना आणि उपक्रमांची माहिती असून, त्यांचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे.
६८ टक्के महिलांनी औपचारिक पद्धतीने कर्ज घेण्याची इच्छा व्यक्त करत वैद्यकीय खर्च, घरगुती देखभाल आणि मुलांचे शिक्षण किंवा शेतीविषयक गरजा या कामांसाठी वाजवी दरात कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली.
ऑनलाइन कॉमर्स सुविधा (२४ टक्के) आणि ऑनलाइन मनोरंजन (१८ टक्के) वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. ९६ टक्के महिलांनी रेल्वेतिकीट आरक्षित करण्याची इच्छा व्यक्त केली.
९५ टक्के महिलांनी रोख पैसे काढण्यासाठी ‘एईपीएस’ला पसंती देत असल्याचे सांगितले. रोख पैशांना प्राधान्य असले, तरी आधार कार्डावर आधारित व्यवहार व यूपीआय क्यूआर कोडला पसंतीही वाढत आहे.
साधारण १८-३० वर्षे वयोगटातील आणि ३१-४० वर्षे वयोगटातील महिला डिजिटल पातळीवर अधिक सक्षम आहेत.