Team Agrowon
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात केसर आंब्याला ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच बऱ्याच बागांमध्ये मोहर आला आहे.
मोहराचे प्रमाण पाच ते दहा टक्क्यांपर्यंत असले तरी १० ते १२ नोव्हेंबर दरम्यान थंडी पडली तर ८० टक्के मोहोर दिसेल. तसे झाले तर गतवर्षीच्या तुलनेत पंधरवड्यापेक्षा जास्त काळ आधी केसर बाजारात विक्रीसाठी येईल, अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कोकण व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रात केसर आंब्याला नियमित मोहर येण्याचा कालावधी डिसेंबर, जानेवारी असा असतो. या मोहराची फळे १५ ते २० मे ला काढायला सुरुवात होऊन १५-२० जूनपर्यंत चालतात. .
जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये कल्टार दिल्यास केसर आंब्यास नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात हमखास मोहर येतो. या मोहराची फळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच काढण्यास सुरुवात होतात. अगदी १५ ते २० मेपर्यंत काढणीला येतात.
अपेक्षेनुसार १० ते १२ नोव्हेंबर दरम्यान थंडी पडली नाही तर काही प्रमाणात नवती येईल. अन्यथा अपेक्षित थंडी पडली तर ८० टक्के मोहर दिसेल.
आता अनेक बागांमध्ये ६० ते ७० टक्के काडीपक्व असून पाच ते दहा टक्के मोहर आला आहे. केवळ दहा ते पंधरा टक्केच नवती दिसते आहे..
ज्यांनी कल्टार दिलेले आहे त्या बागेत आता कमीत कमी ७५ टक्के मोहर येईपर्यंत पाणी देऊ नये असा नियम आहे. परंतु पाऊसच पडला नाही आणि बाग पूर्ण सप्टेंबरपासून विना पाण्याची आहे, जमीन हलकी आहे, अशा बागायतदारांनी मात्र हलके एखाद दोन पाणी द्यावे.