Team Agrowon
माळरान, डोंगर व शेताच्या बांधावर आकर्षक तेरड्याची फुले फुलली आहेत.
जांभळट, फिकट गुलाबी, लाल किंवा पांढरी अशा विविध आकर्षक रंगांची ही फुले सगळ्यांचेच लक्ष वेधत आहेत.
गणपतीबरोबर येणाऱ्या गौरीमातेला विशेषकरून ही फुले अर्पण केली जातात. त्यामुळे या झाडाला गौरी किंवा गौरीची फुले किंवा गुल मेहंदी असेही म्हटले जाते.
गौरी गणपतीच्या सणाला पूजेकरिता तेरड्याची पाने-फुले वाहतात. तेरडा ही वनस्पती बाल्समिनेसी कुळातील असून तिचे शास्त्रीय नाव इंपॅटिएन्स बाल्समिना आहे.
ती मूळची दक्षिण आशियातील भारत आणि म्यानमार देशांतील असून जगभर इंपॅटिएन्स प्रजातीच्या ८५० ते १००० प्रजाती आहेत.
भारतात यातील १५० प्रजाती आढळतात. ही वनस्पती समुद्रसपाटीपासून सुमारे १५०० मीटर उंचीपर्यंतच्या प्रदेशात, वनांमध्ये झाडाझुडपांच्या खाली वाढलेली आढळते.
पाने साधी, सुमारे १५ सेंमी लांब व भाल्यासारखी निमुळती असतात. तेरड्याच्या पानांची मांडणी सर्पिलाकार व कडा दंतूर असतात. फुले गुलाबी, लाल, भगवी एकाकी किंवा झुबक्यांनी पानांच्या बगलेत येतात.
पावसाळी सुरू झाला की तेरडा उगवायला सुरूवात होते. ही वनस्पती ३० ते ९० सेंमी उंच वाढते. खोड मांसल असून फांद्या आखूड असतात.