Mahesh Gaikwad
पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने गिधाडांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. मृत जनावरांचे मांस खाऊन निसर्ग निरोगी ठेवण्याचे काम गिधाडे करतात.
मात्र, निसर्गााचा हाच मित्र आता विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. १९८० च्या दशकापर्यंत देशातील गिधाडांची संख्या ४ कोटींहून अधिक होती. ती आता ४० लाखांवर आली आहे.
भारतातील गिधाडांच्या प्रजाती विलुप्त होण्याची अनेक कारणे आहेत. जनावरांसाठी वापरली जाणाऱ्या अॅसिक्लोफेनॅक आणि डायक्लोफेनॅक या औषधांमुळे गिधाडे दगवात आहेत.
आजारी जनावरांना ही औषधे दिली जातात. गेल्या दोन दशकांमध्ये देशातील ९० टक्के गिधाडे यामुळे दगावली असून काही प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
आजारी जनावरांवर उपचारादरम्यान देण्यात येणारी औषधे जनावर मृत झाल्यानंतर मांसासोबत गिधाडांच्या पोटात जातात. त्यामुळे गिधाडांच्या किडनीवर गंभीर परिणाम होऊन दगावतात.
भारत सरकारने याचे गांभीर्य ओळखून गिधाडांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या जनावरांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या या औषधांवर बंदी घातली आहे.
तसेच वन विभाग, पशुसंवर्धन विभाग, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून गिधाड वाचविण्यासाठी जनजागृती केली जात आहे.