Team Agrowon
हळद ही कमोडिटी तुलनेने छोटी गणली जाते. संपूर्ण देशात जेमतेम १०-१२ लाख टन सरासरी वार्षिक उत्पादन असणाऱ्या या मसाला पिकामध्ये भारताची मक्तेदारी आहे. जगातील ७७ टक्के हळद उत्पादन आपल्या देशात होते.
भारतीय पद्धतीच्या जेवणात दररोज चिमूटभर वापरला जाणारा मसाला आणि काही प्रमाणात औषधी उपयोगासाठी लागणारी गोष्ट आणि त्या अनुषंगाने होणारी निर्यात एवढीच मर्यादित ओळख हळदीची अगदी अलीकडेपर्यंत होती.
पण कोविडच्या भयानक कालखंडानंतर हळदीला चांगले दिवस आले, असे म्हणता येईल. कारण हळदीच्या औषधी गुणांची खऱ्या अर्थाने जगाला ओळख झाली.
हळदीच्या किमतीदेखील वाढल्यामुळे व्यापारी वर्गात हळद अधिकच चर्चेत आली.
जागतिक बाजारात हळदीच्या निर्यातवृद्धीला सातत्य दिसू लागले आणि त्यातून चांगला आर्थिक फायदा होऊ लागला.
त्यानंतर भारतात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे उत्पादनात ३०-४० टक्के घट झाली. या सर्व घटकांची एकाच वेळी मोट बांधली गेली आणि त्यातून हळदीचे भाग्य उजळले.
एका अर्थाने हळदीला ‘ग्लॅमर’ (वलय) लाभले आणि हळदीच्या किमतीने प्रति क्विंटल २० हजार रुपयांचे नवीन शिखर गाठले.