Team Agrowon
मॉन्सूनोत्तर पावसामुळे बोंडातील कापूस भिजला आहे. परिणामी वेचणीस हा कापूस त्रासदायक ठरत असल्याने मजुरांकडून या कापसाच्या वेचणीसाठी प्रती किलो ११ ते १२ रुपयांची मागणी होत आहे.
दुसरीकडे कापसाचे दर सहा हजारांवर स्थिरावल्याने या वाढलेल्या उत्पादकता खर्चाची भरपाई कशी होणार, या विवंचनेत शेतकरी आहेत.
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्याचा फटका कापूस उत्पादकांना बसला आहे.
पावसामुळे बोंडात परिपक्व अवस्थेतील कापूस भिजला त्याच्या परिणामी असा कापूस वेचणीत अडचणी निर्माण होतात.
त्यामुळे मजुरांकडून वाढीव पैशाची मागणी केली जात आहे. पावसाने भिजलेला कापूस बोंडातच चिकटून राहत असल्याने तो सहज निघत नाही.
दोनदा काढावा लागतो, त्यात श्रम खर्ची होत असल्याने मजुरी दर वाढवून हवा, असा मजुरांचा आग्रह आहे.