Team Agrowon
गारा म्हणजे बर्फाचा गर्भ आहे. ढगाच्या गरम तळाशी असलेले पाण्याचे थेंब म्हणजेच भविष्यातील गार असते. कारण हे थेंब ढगांबरोबर असतात.
उर्ध्वगामी प्रवाहाबरोबर अति उंचीवर हे पाण्याचे थेंब जातात आणि तेथे गोठण पावतात, त्यास बर्फाचा गर्भ अर्थात गार असे म्हणतात. अशा गोल आकाराच्या गारा, ५५ मायक्रोमीटर आकाराच्या असतात.
थंडरस्ट्रॉंम वातावरणीय स्थितीमुळे बर्फाच्या ढगांची निर्मिती होते. भूपृष्ठावरून अवकाशात अति उंचीवर वातावरणाच्या थरामध्ये सारखी घुसळण चालू असते. अशा स्थितीमध्ये जेव्हा ढगांची निर्मिती होते;
ज्या ढगांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते, हे ढग एकमेकांवर आदळतात. त्यामुळे घर्षण होऊन तेथे मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण होते, विजांचा कडकडाट होतो, आवाजाची निर्मिती होते.
ढगांमध्ये असणाऱ्या अतिशीत पाण्याच्या कणांचे एकमेकांबरोबर मिलन होते.त्यामधून मोठ्या आकाराच्या बर्फासारख्या ढगांची निर्मिती होते. अशा स्थितीला हवामान शास्त्रीय भाषेमध्ये थंडरस्ट्रॉंम असे म्हटले जाते.
अशा वातावरणीय स्थितीमुळे ‘क्युमुलोनिंबस म्हणजेच कापशी वर्षा ढग' निर्माण होतात. या ढगांमधून मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि गारांचा वर्षाव भूपृष्ठावर होत असतो.
कापशी वर्षा ढगांपासून पडणाऱ्या अति शीत पाण्याच्या थेंबांचा सम्मुचय किंवा बर्फाच्या लहान लहान तुकड्यांचा पाऊस म्हणजे गारा होय. ज्यांचा आकार ५ ते ५० मिलिमीटर किंवा त्यापेक्षा अधिक असतो.