Team Agrowon
यंदाच्या हंगामात गुळाला चांगला दर मिळत असल्याने गूळ उत्पादकांमध्ये समाधान पसरले आहे. पंधरवड्यापूर्वी असणारे मंदीचे मळभ दूर झाले असून, गुळाच्या दरात क्विंटलला ४०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे.
सध्या येथील बाजार समितीत येणाऱ्या गुळास प्रतिक्विंटल ३८०० ते ४५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
प्रथम दर्जाच्या गुळास क्वचित प्रसंगी ४९०० रुपयांपर्यंत दर जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३५ टक्के गुऱ्हाळघरे कमी प्रमाणात सुरू झाली आहेत. यामुळे गुळाचे उत्पादन कमी होत आहे. याचाच परिणाम आवक घटण्यावरही झाला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत अडीच लाख रव्यांनी आवक घटली आहे. उसाप्रमाणे यंदाचा गूळ हंगामही लवकर संपण्याची शक्यता आहे. यामुळे गुजरातमधील व्यापाऱ्यांनी शीतगृहासाठीही खरेदी सुरू केली आहे.
तसेच संक्रातीसाठीही गूळ खरेदी करण्यास व्यापारी प्राधान्य देत असल्याने या सर्व बाबींचा एकत्रीत परिणाम गूळदर सुधारण्यावर झाला आहे. सध्या बाजार समितीत ३० ते ३५ हजार गूळ रवे विक्रीसाठी येत आहेत.
बाजार समितीत वर्षभर गुळाचे सौदे सुरू असतात. यंदा पावसाळा कमी असल्याने पंधवरवड्याचा कालावधी वगळता बाजार समितीत एक दिवसाआड गुळाचे सौदे होत होते.