Team Agrowon
पावसाळ्यापूर्वी मोठ्या जनावरांमध्ये घटसर्प, फऱ्या, फाशी आणि सांसर्गिक गर्भपात या आजारांविरुद्ध तर शेळ्या-मेंढ्यामध्ये पीपीआर, आंत्रविषार, देवी आणि घटसर्प या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे ठरते.
आजाराची बाधा होण्यापूर्वी लसीकरण करणे गरजेचे आहे. कारण लस टोचल्यानंतर जनावरांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होण्यास किमान १५ दिवसांचा कालावधी लागतो.
लसीकरण करण्यापूर्वी सर्व जनावरांना एक आठवडा आधी जंतनिर्मूलनाचे औषध दिले पाहिजे. यासोबतच जनावरांच्या शरीरावरील तसेच गोठ्यातील गोचीड, गोमाशी यांचाही बंदोबस्त करावा.
जनावरांना आहारातून क्षार मिश्रणांचा व जीवनसत्त्वाचा पुरवठा करावा. यामुळे जनावरांना टोचलेल्या लसीमुळे रोगप्रतिकारशक्ती निर्माण होऊन चांगले परिणाम होतात.
लसीकरणासाठी नेहमी नामांकित कंपनीची लस निवडावी. कारण या लसीवर योग्य संशोधन आणि चाचण्या झालेल्या असतात.
लस योग्य तापमानात म्हणजे कोल्ड चेनमध्ये ठेवूनच लसीकरण करणे गरजेचे आहे. लसीकरण पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावे.
जनावरांना लागणाऱ्या बहुतांश लसी या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध असतात. काही कारणामुळे लस उपलब्ध नसल्यास पशुवैद्यकाच्या सल्ल्याने बाजारातून लस उपलब्ध करून घ्यावी.