Team Agrowon
वाढत्या दुग्धोत्पादन क्षमतेसोबतच उच्च उत्पादक गाई, म्हशीमध्ये नियमितपणे गर्भधारणा होण्याचे प्रमाण घटत आहे. हे लक्षात घेऊन यशस्वी गर्भ धारणेविषयी काही महत्त्वाच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.
निवडक सिद्ध वळूंचा वापर रेतनासाठी वापर केला जातो. तसेच कृत्रिम रेतन, भृणप्रत्यारोपण, एकत्रित माज पद्धतीचा उपयोग करणे व इतर प्रजनन विषयक बाबींचा सहभाग दुधाळ जनावरांची उत्पादकता वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतो.
तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च उत्पादकता असणारी नवीन पिढी निर्माण होत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार दुधाची गरज तसेच प्रति जनावरावरील पालन पोषणाचा खर्च यांचा ताळेबंद घालण्यासाठी प्रति जनावर उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे.
नफ्यातील दुग्धव्यवसायासाठी पशुपालकांनी प्रजनन व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करून अभ्यासपूर्ण पद्धतीने निर्णय घेणे खूप महत्त्वाचे आहे.
गाई किंवा म्हशी ऑक्टोबर ते मार्च या काळात गाभण राहिल्या पाहिजेत. कारण की या काळात ताणविरहित वातावरण आणि हिरव्या वैरणीची उपलब्धता हे दोन सर्वात महत्त्वाचे घटक यशस्वी प्रजननासाठी अनुकूल असतात.
ताणविरहित वातावरण आपण उष्ण कटिबंधात येत असल्यामुळे वर्षातील बराचसा काळ वातावरणाचे तापमान वाढलेले असते. त्यामुळे जनावराच्या शरीराचे तापमान वाढते.
अतिरिक्त तापमान वाढीमुळे ते नियंत्रित ठेवण्यासाठी जनावराला अतिरिक्त ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे जनावरांमध्ये वातावरणाचा ताण निर्माण होतो. या ताणामुळे गाई, म्हशीमध्ये माजावर न येणे, वारंवार माजावर येणे अशा समस्या उद्भवतात.
सर्वसाधारणपणे ऑक्टोबर ते मार्च या काळामध्ये तापमान निर्देशांक (३०-३४ अंश सेल्सिअस) कमी असतो. हा निर्देशांक यशस्वी प्रजननासाठी गाई व म्हशीमध्ये प्रजननासाठी योग्य आहे. म्हणून पशुपालकांनी शक्यतो याच काळात सर्व पायाभूत तयारी करून गाई, म्हशीची गर्भधारणा करून घ्यावी.
मुबलक प्रमाणात हिरव्या वैरणीची उपलब्धता सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात मॉन्सूनचा पाऊस चांगला झाल्यास सकस हिरवी वैरण उपलब्ध असते. या वैरणीमधून जनावरांना विविध पोषक तत्त्वे उपलब्ध होतात.
उत्तम प्रजननासाठी शरीरामध्ये योग्य प्रमाणात प्रथिने, ऊर्जा, खनिजे, जीवनसत्वे उपलब्ध असल्यास संप्रेरकांची निर्मिती योग्य प्रमाणात झाल्यामुळे कार्यक्षम स्त्रीबिजाची निर्मिती होऊन यशस्वी गर्भधारणा होऊ शकते.