चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा
खानदेशात पपई दराचा तिढा दर महिन्याला तयार होत असतानाच सध्या आठ रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना जागेवर किंवा शिवार खरेदीत मिळत आहे.
शेतकऱ्यांना कमी दर दिले जात असून, नऊ रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर किंवा शिवार खरेदीत मिळावा, अशी मागणी केली जात आहे.
पपईची काढणी ऑक्टोबरपासून सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक सुमारे पाच चार हजार ५०० हेक्टरवर पपई आहे. त्यात शहादा तालुक्यात साडेचार हजार हेक्टर एवढे पपईचे क्षेत्र आहे.
पपईची लागवड धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील यावल, चोपडा, जामनेर, मुक्ताईनगर, रावेर भागातही झाली आहे. दर महिन्यागणिक कमी झाले आहेत. सुरुवातीला शिवार खरेदीत किंवा थेट जागेवर ३० ते ३५ रुपये प्रतिकलोचे दर मिळाले.
नंतर २५ ते ३० रुपये, नोव्हेंबरमध्ये सरासरी २० रुपये प्रतिकिलोचा दर होता. नोव्हेंबरच्या अखेरीस १० ते १२ रुपये दर होता.
या महिन्यात आठ रुपये एक पैसा ते आठ रुपये १० पैसे दर मिळत आहे. उत्पादन खर्चानुसार हा दर परवडत नसल्याची स्थिती आहे. कारण पपईला जेवढा खर्च लागला, तेवढे दर नाहीत, असे चित्र आहे.