Team Agrowon
पंजाबच्या धर्तीवर लागवड ते काढणी आणि बाजारपेठ अशा सर्वच टप्प्यावर तांत्रिक सहकार्य करण्याच्या उद्देशाने गेल्या चार वर्षांपूर्वी सिट्रस इस्टेटची उभारणी करण्याचा निर्णय झाला.
परंतु मनुष्यबळ आणि निधीअभावी हे काम तसूभरही पुढे सरकले नसल्याची स्थिती आहे. संत्रा पिकाबाबतची सरकारची उदासीनता चव्हाट्यावर आल्याचा आरोप होत आहे.
पंजाब सरकारने काही कोटी रुपयांच्या मुदत ठेवींद्वारे त्यावरील व्याजावरच सिट्रस इस्टेटचा प्रभावी कारभार चालविण्यावर भर दिला आहे.
त्या भागातील उत्पादकांना दर्जेदार रोपांपासून ते लागवड आणि काढणी तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यापर्यंतचे मार्गदर्शन ‘सिट्रस इस्टेट’च्या माध्यमातून होते.
नागपुरी संत्र्याचे उत्पादन होणाऱ्या पट्ट्यात देखील अशा प्रकारच्या सिट्रस इस्टेट असाव्यात, अशी मागणी ‘महाऑरेंज’ने रेटली होती.
त्याची दखल घेत सिट्रस इस्टेट स्थापन करण्याची घोषणा झाली. तळेगाव (शामजी पंत, वर्धा), उमरखेड (अमरावती) ढिवरवाडी (नागपूर) येथे त्या प्रस्तावित आहेत. या तीन सिट्रस इस्टेटसाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला.