Radhika Mhetre
हरभऱ्यात रोपावस्थेत येणारा पहिला महत्वाचा रोग आहे मर. हा रोग बुरशीमुळे येतो. या रोगाचा प्रादुर्भाव होताच पाने पिवळी पडून कोमेजतात.
शेंडा मलूल होतो आणि झाड हिरवे असतानाच वाळते. या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पिकाच्या रोपावस्थेत आणि पीक प्रौढावस्थेत म्हणजेच पीक ६ आठवड्यांचे असताना दिसून येतो.
रोप उभे चिरले तर आतील उती काळपट तांबूस दिसतात.
पिकाच्या प्रौढावस्थेत म्हणजेच पीक साधारण ६ आठवड्यांचे झाल्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास झाड शेंड्याकडून मलूल होऊन सुकते.
झाडाची खालील पाने पिवळी पडतात. काही पाने मात्र हिरवीच असतात.
२ ते ३ दिवसांनी हळूहळू सर्व पाने पिवळी पडतात. ही पिवळी झालेली पाने पीक पक्व होईपर्यंत झाडावर सुकलेली दिसतात.
कधी कधी संपूर्ण झाड न वाळता काही फांद्याच वाळलेल्या दिसतात. झाड वाढल्यानंतरही बुरशी रोपाच्या इतर भागात राहते.