Manoj Kapade
सातपुडा भागात भटकंती करीत काल सूर्यास्त पाहिला. दुसऱ्या दिवशी मात्र डोंगरदऱ्या सोडून मी भटकंती केली ती खऱ्याखुऱ्या भटक्या जमातीमधील एका तांड्यासोबत; आणि ती देखीलडांबरी रस्त्याने.
तांड्यात सारेच निर्वासित होते. मात्र, तुमच्या आमच्या शहरात असलेला माणसा माणसातील भेद या तांड्यात नव्हता. जनावरांनाही प्रतिष्ठा, प्रेम दिले जात होते. माणसं,कुत्री, घोडी, बकऱ्या, मेंढरं हे सारे समान नीती नियमात चालत होते. एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी शांतपणे चालत राहणे हेच त्यांचं मुख्य ध्येय होते.
काही माणसं घोड्याच्या पाठीवर बसली होती आणि कुत्रीसुध्दा थकल्यावर घोड्यावरून प्रवास करीत होती. मुले पायी होती. मुले घोड्यावरही होती.
काही बकरे घोड्याच्या कुशीतील पिशवीत विश्रांती घेत होती. स्त्री-पुरुष असा भेद नव्हता. त्या सृष्टीत तसे सर्व जण समान दुःखी कष्टी होते. परंतु, माणसं जनावरांची आणि जनावरे माणसांची काळजी घेत होती.
मेंढरं छान चालत होती. कधी मी मेंढरांच्या मागे; तर ते कधी पुढे चालत होतो. बरेच चालून गेल्यावर तांडा विभागला गेला.
काही माणसं व जनावरे असलेला एक कळप तप्त डांबरी रस्त्याने पुढे गेला; तर एक कळप काही जनावरे आणि माणसांना घेत जंगलाच्या दिशेने शांततेत निघून गेला.