Anuradha Vipat
दिवाळीचा पहिला दिवा आणि गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी गाई-वासराची पूजा करण्याची आपल्याकडे प्राचीन परंपरा आहे.
या मंगलमयी दिनी लाडक्या बळीराजाच्या गोधनाला दाखवण्यासाठी बाजरीची भाकरी आणि गुळ-खोबऱ्याचा पारंपारिक नैवेद्य घरीच कसा बनवायचा, याची अत्यंत सोपी रेसिपी आज आपण पाहणार आहोत.
बाजरीचे पीठ, गरम पाणी , चवीनुसार मीठ. मोड आलेले मूग आणि मटकी, तूप, जरे, हळद, चवीनुसार मीठ आणि ओल्या नारळाचा चव, गूळ आणि खोबरे किंवा पुरणाची उकडलेली दिंड.
पाणी गरम करायला ठेवा. पाण्यात थोडे मीठ आणि १ चमचा तूप घाला. पाण्याला उकळी आली की गॅस बारीक करून त्यात बाजरीचे पीठ घाला आणि चांगले ढवळून घ्या. पातेल्यावर ५ मिनिटे झाकण ठेवा.
पीठ थोडे कोमट झाल्यावर ते हाताने चांगले मळून घ्या. पारंपरिक पद्धतीने हा नैवेद्य तव्यावर न भाजता पाण्यात उकडला जातो किंवा वाफेवर शिजवला जातो. पिठाचे छोटे गोळे करून ते वाफेवर १० ते १२ मिनिटे शिजवून घ्या.
पातेल्यात १ चमचा तूप गरम करा. त्यात जिरे आणि हळदीची फोडणी द्या. मोड आलेले मूग आणि मटकी पातेल्यात टाकून परतून घ्या.
चवीनुसार मीठ आणि अगदी थोडे पाणी घालून मंद आचेवर भाजी वाफेवर शिजवून घ्या. वरून ओल्या नारळाचा चव घालून नैवेद्याची उसळ तयार करा.