Team Agrowon
गादीवाफ्यावर कांदा रोपांची लागवड करण्यापुर्वी जमिनीची मशागत करताना मध्यम भारी जमिनीमध्ये खोल नांगरणी करावी. त्यानंतर २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
प्रति हेक्टरी २५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. त्यानंतर उंच गादीवाफे तयार करावेत. जेणेकरून वाफ्यांमध्ये पावसाचे पाणी जास्त वेळ साठून राहणार नाही. शक्यतो सपाट वाफ्यात लागवड टाळावी.
गादीवाफे १२० सेंटीमीटर रुंद, १५ सेंटीमीटर उंच आणि सोईनुसार लांब बनवावेत. या गादीवाफ्यांवर दोन्ही बाजूंनी एक फुटाचे अंतर सोडून ठिबक सिंचनाच्या दोन किंवा तीन नळ्या टाकाव्यात, जेणेकरून वाफ्यावर सर्व भागांमध्ये समान सिंचन होईल.
रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी ठिबक किंवा तुषार सिंचनाचा संच चालू करून सरासरी ४ ते ५ सेंटीमीटर खोलीपर्यंत ओल राहील इतके पाणी द्यावे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रोपांची लागवड करावी.
माती परीक्षणानुसार खतांची मात्रा ठरवावी. खरीप कांदा पिकाला प्रति हेक्टरी ११० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश आणि ५० किलो गंधक लागवडीच्या वेळी द्यावे.
लागवडीपूर्वी रोपाची मुळे कार्बोसल्फान २ मिलि प्रति लिटर पाणी आणि कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी द्रावणामध्ये दोन तास बुडून ठेवावीत. यामुळे कीड आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो
रोप लागवड करताना दोन ओळींतील अंतर १५ सेंटीमीटर आणि दोन रोपांतील अंतर १० सेंटीमीटर ठेवावे. पेरणीनंतर २० दिवसांनी खुरपणी करावी.