Team Agrowon
ज्वारीमध्ये ठिबक सिंचन तंत्राच्या वापरासाठी ज्वारीच्या लागवड पद्धतीत थोडासा बदल करावा लागतो. भाजीपाला पिकासाठी उपलब्ध असलेला ठिबक संच म्हणजे दोन लॅटरलमधील अंतर ४ फूट असल्यास रब्बी ज्वारीसाठी वापरता येतो.
मध्यम ते हलक्या जमिनीसाठी दोन ओळींतील अंतर ४५ सेंटीमीटर आणि दोन झाडातील अंतर १५ सेंटीमीटर इतके ठेवावे. मध्ये ७५ सेंटीमीटर मोकळा पट्टा ठेवावा. एका जोड ओळीसाठी एक ठिबक नळी वापरावी.
ज्वारीसाठी शेताच्या किंवा पिकाच्या ओळीच्या लांबीनुसार १२ किंवा १६ मिलीमीटर व्यासाच्या इनलाइन नळ्या वापराव्यात. यामध्ये साधारण ३० ते ४० सेंटीमीटर अंतरावरील आणि २.४ लिटर प्रति तास प्रवाह असलेल्या ड्रीपरची इनलाइन लॅटरल निवडावी.
रब्बी ज्वारीसाठी ठिबक सिंचनाद्वारे लागणाऱ्या पाण्याची गरज ही झाडाची वाढीची अवस्था, बाष्पीभवनाचा वेग, पात्र गुणांक, पिकांचा गुणांक, जमिनीचा प्रकार, ओलाव्याचे क्षेत्र यावर अवलंबून असते.
रब्बी हंगामात बाष्पीभवनाचा वेग साधारणपणे कमी असल्यामुळे विजेच्या उपलब्धतेनुसार संच चालवावा. रब्बी हंगामातील इतर पिकांची सिंचनाची सोय आणि विजेची उपलब्धता यानुसार संच दर दोन किंवा तीन दिवसांनी चालवावा.
रब्बी हंगामात काही भागात साधारण २ ते ३ वेळा पाऊस पडतो. त्या काळात ठिबक संच चालविण्याची गरज लागत नाही.
रब्बी ज्वारीच्या वाढीच्या काळात म्हणजे पेरणीपासून १०० ते ११० दिवसात १५ ते २५ वेळा ठिबक संच चालवावा लागेल.