Anuradha Vipat
पारंपरिक दिवाळी फराळामधील सर्वात मानाचा पदार्थ म्हणजे जाळीदार, कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे अनारसे.
योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत वापरली, तर अनारसे अजिबात तेलात विरघळत नाहीत आणि त्यांना छान जाळी पडते.
तांदूळ, गुळ, साजूक तूप, खसखस, तूप किंवा तेल.
तांदूळ स्वच्छ धुवून त्यात भरपूर पाणी घालून ३ दिवस भिजत ठेवा. एका सुती कपड्यावर हे तांदूळ सावलीतच फॅनखाली २ ते ३ तास सुकवून घ्या. हे दमट तांदूळ मिक्सरला थोडे थोडे करून बारीक दळून घ्या आणि बारीक चाळणीने चाळून घ्या.चाळलेल्या तांदळाच्या पिठीमध्ये १.५ कप बारीक किसलेला गूळ आणि २ चमचे साजूक तूप घाला.
हे मिश्रण हाताने चांगले एकजीव करा. हे गोळे एका हवाबंद डब्यात ठेवून किमान २ ते ३ दिवस मुरू द्या. अनारसे बनवायच्या दिवशी पिठाचा गोळा काढून पुन्हा हाताने मळून घ्या. पीठ जास्त कोरडे वाटल्यास त्यात अर्धा चमचा दूध किंवा पिकलेल्या केळ्याचा छोटा तुकडा घालून मळून घ्या.
पोळपाटावर खसखस पसरवून घ्या. पिठाचा छोटा लिंबाएवढा गोळा घ्या आणि खसखसवर ठेवून बोटांच्या मदतीने एकाच बाजूने हलक्या हाताने गोल थापून घ्या. कढईत तूप किंवा तेल मंद ते मध्यम आचेवर गरम करा. अनरसा तेलात सोडताना खसखस असलेली बाजू वरच्या बाजूला राहील अशा पद्धतीने सोडा.
अनरसा तेलात टाकल्यावर तो उलटायचा नसतो. झऱ्याने कढईतले गरम तेल सतत अनारशाच्या वरच्या बाजूवर उडवत राहायचे. गरम तेलामुळे अनारशाला छान जाळी सुटू लागेल . तुमचे अतिशय जाळीदार, रसरशीत आणि खुसखुशीत पारंपरिक अनारसे तयार आहेत!