Team Agrowon
सध्या उपलब्ध चाऱ्याचा सुयोग्य वापर करावा. चारा कुट्टी करून जनावरांच्या शारीरिक गरजेनुसार द्यावा. विनाकारण जास्तीचा चारा जनावरांना देवू नये.
गोठ्यातील जनावरांची शारीरिक अवस्थेनुसार वर्गवारी करून त्यांना चाऱ्याची किती गरज आहे त्या प्रमाणातच चारा द्यावा.
कडब्याची पेंढी सोडून जशीच्या तशी जनावरांना खाण्यास न देता कुटटी करून द्यावी. एकाचवेळी जास्त चारा न टाकता विभागून द्यावा. जेणेकरून चाऱ्याचा जास्त अपव्यय होणार नाही.
चारा जमिनीवर न टाकता गव्हाणीत द्यावा. जेणेकरून चारा तुडवून खराब होणार नाही. चारा टाकलेल्या गव्हाणीत मोठी जनावरं अथवा लहान वासरे जाऊन चारा खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.
वाळलेल्या चाऱ्याचे खाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी गूळ आणि मीठ एक टक्का या प्रमाणात फवारून रात्रभर झाकून ठेवून सकाळी जनावरांच्या आहारात वापर करावा. यामुळे चारा न खाता वाया जाणार नाही.
वाळलेल्या चाऱ्याचे पचन वाढवण्यासाठी प्रोबायोटिक्सचा जनावरांच्या आहारात वापर करावा. सध्या जास्तीचा हिरवा चारा असेल तर मुरघास बनवून चारा साठवून ठेवावा.
उपलब्ध चाऱ्याच्या ठिकाणी जनावरे चरायला न सोडता तसा चारा कापून ठेवावा. त्यानंतर जनावरांच्या गरजेनुसार आहारात वापर करावा. यामुळे जनावरांनी तुडवून चारा खराब होणार नाही तसेच चाऱ्याची चांगली वाढ होईल.