महारुद्र मंगनाळे
स्वच्छ हवा, प्रसन्न, आल्हाददायी वातावरण असणारं शहर शोधतोय मी! असं कोणतं शहर आहे तुमच्या अनुभवातलं! तीन दिवसातच एखाद्या जेलमध्ये कोंडल्यागत अवस्था झालीय, माझी या शहरात!
रस्त्याने पायी निघालो की,सगळीकडं गटारीच्या घाणीचे उग्र वास येतात.धुळीसाठी गॉगल आणि मास्क वापरता येतो. पण हे वास टळत नाहीत. श्वास घ्यायला त्रास होतो. अस्वस्थ होऊन जातो. त्यातही घरात,मुक्तरंग मध्ये असलो तर ठिक असतो
मला नेहमीच प्रश्न पडतो,हे वास मलाच येतात का? इतर लोक एवढे अस्वस्थ झालेले दिसत नाहीत मला .त्यांना वासाची सवय झालीय की, वासच येत नाहीत?
इथं आलो की,नसलेली सर्दी सुरू होते. डोळे जळजळतात. घशात खरखर सुरू होते. कितीही प्रयत्न केला तरी, या शहरातली माझी सकाळ उत्साही होत नाही!
मुक्काम करणं आवश्यकच असतं,तेव्हाच मी थांबतो..तरीही हे टाळता यावं असं वाटतं..पण मुक्तरंग मधील काम वेगाने संपवायचं तर,लातूरात मुक्काम करणं अटळ ठरतं. मुक्तरंग मध्ये असतो तेव्हा मात्र फ्रेश,उत्साही असतो.
पहिल्या मजल्यावर जागा असल्याने, रस्त्यावरील वर्दळीचा तसा थेट त्रास होत नाही. धूळ व आवाज माझ्यापर्यंत पोचत नाहीत. शिवाय ते काम माझ्या आवडीचं असल्याने, मी रमून जातो.