Anuradha Vipat
भाज्या शिजवताना अनेकदा त्यातील महत्त्वाची व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स नष्ट होतात.
भाज्यांमधील पोषक तत्वे १००% टिकवून ठेवण्यासाठी स्वयंपाकघरात खालील टिप्स आवर्जून वापराव्यात.
भाज्या नेहमी चिरण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्याव्यात. चिरल्यानंतर भाज्या धुतल्यास त्यातील पाण्यात विरघळणारी व्हिटॅमिन्स पाण्यासोबत वाहून जातात.
भाज्यांचे तुकडे शक्य तितके मोठे ठेवावेत. भाज्या जेवढ्या बारीक चिरल्या जातात, तेवढा त्यांचा हवेतील ऑक्सिजनशी संपर्क वाढतो आणि पोषक तत्वे वेगाने नष्ट होतात.
गाजर, काकडी, बटाटा, रताळे किंवा दुधी भोपळा यांसारख्या भाज्यांची साल अतिशय पातळ काढावी किंवा शक्य असल्यास साल न काढता भाजी बनवावी.
भाज्या शिजवण्याची स्टीमिंग ही सर्वात उत्तम पद्धत आहे. भाज्या पाण्यात उकळण्याऐवजी वाफेवर शिजवल्यास त्यातील पोषक तत्वे आणि रंग दोन्ही उत्तम टिकून राहतात.
जर भाजी पाण्यात शिजवायची असेल, तर पाण्याचे प्रमाण अगदी कमी ठेवावे. भाजी शिजवलेले पाणी फेकून देऊ नका, ते पाणी आमटी किंवा कणिक मळण्यासाठी वापरावे.