Team Agrowon
पीक उगवून आल्यावर त्यात ठराविक दिवसानंतर कोळपणी केली जाते. त्याचा मुख्य उद्देश तण नष्ट करणे आणि वाया जाणारी ओल थोपवण्यासाठी होतो.
तणांच्या प्रादुर्भावामुळे कमी होणारी ओल, तणांचा बंदोबस्त केल्याने टिकवून ठेवली जाते. याशिवाय कोळपणी केल्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावर एक पोकळ थर तयार होतो. त्यामुळे उडून जाणारी ओल थोपविता येते. यामुळे ओल टिकवून धरण्यामध्ये ‘कोळपणी’चा फार मोठा वाटा आहे
रब्बी हंगामात कोळपणी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. एकदा कोळपणी केली, तर जवळपास एक पाणी दिल्याप्रमाणे फायदा होतो. या तत्त्वाचा अवलंब करून कोरडवाहू शेती तंत्रामध्ये रब्बी ज्वारीकरिता तीन वेळेस कोळपणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
पहिली कोळपणी पीक तीन आठवड्यांचे झाल्यानंतर फटीच्या कोळप्याने करावी. त्यामुळे शेतात वाढणारे तण नष्ट होऊन पाण्याचा होणारा अपव्यय टाळता येतो.
दुसरी कोळपणी पीक पाच आठवड्यांचे झाल्यानंतर, पासेच्या कोळप्याने करावी. त्या वेळेस जमिनीतील ओल कमी झाल्याने जमिनीला सूक्ष्म भेगा पडण्यास सुरुवात झालेली असते. या कोळपणीमुळे या भेगा बुजण्यास मदत होते. त्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया मंदावते.
तिसरी कोळपणी पीक आठ आठवड्यांचे झाल्यानंतर करावी. या कोळपणीसाठी दातेरी कोळपे वापरण्याची शिफारस आहे. या काळात जमीन टणक झाली असल्याने फासाचे कोळपे व्यवस्थित चालत नाही.
तिसऱ्या कोळपणीसाठी दातेरी कोळपे वापरल्यास ते मातीत व्यवस्थित घुसून माती मोकळी होऊन भेगा बुजविल्या जातात. जमिनीत ओल फार कमी असेल, त्यावेळी आणखी एखादी कोळपणी केल्यास फायदेशीर ठरते.
कोरडवाहू रब्बी ज्वारी तयार होण्यास साधारणपणे १८० पासून २८० मि.मी. ओल आवश्यक असते. त्यापैकी ४० टक्के ओल पीक फुलोऱ्यात येण्यापासून तयार होण्याच्या अवस्थेत लागते. त्यामुळे पुरेशी ओल उपलब्ध होण्यासाठी उपाय करणे आवश्यक आहे.