Team Agrowon
पावसाळ्यात बदलत्या हवामानासोबतच ओलसरपणा, चिखल, अस्वच्छता यामुळे रोगजंतूंचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे जनावरांच्या आरोग्यविषयक समस्या जास्त प्रमाणात वाढतात. हे लक्षात घेऊन जनावरांच्या व्यवस्थापनात बदल करावेत.
पावसाळी वातावरणात संसर्गजन्य आजारांचा (घटसर्प, फऱ्या, लाळ्या खुरकूत) प्रादुर्भाव होतो. हे लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वी जनावरांना लसीकरण करावे.
दुधाळ जनावरांच्या कासेची योग्य काळजी न घेतल्यास कासदाह होतो. हे लक्षात घेता दूध काढण्याची जागा स्वच्छ असावी, दूध काढल्यानंतर सडांचे निर्जंतुकीकरण करावे. यामुळे सडाच्या छिद्रातून सूक्ष्मजीव जात नाहीत.
दूध काढणारी व्यक्ती निर्व्यसनी, निरोगी असावी. खराब दूध (गाठी, रक्त,पू) निघाल्यास तातडीने पशुवैद्यकाकडून उपचार करावेत.
गोठ्यामधील भिंतीच्या भेगांमध्ये गोचिडांची अंडी असतात. त्यामुळे ठरावीक कालावधीनंतर फ्लेमगनच्या साह्याने गोचिडांच्या अंड्यांचा नायनाट करावा.
वासराला पहिले ६ महिने; दर ३० दिवसांनी आणि त्यानंतर प्रत्येक ४ महिन्यांनी जंतनाशक द्यावे. प्रत्येक ऋतूच्या सुरुवातीला एकदा जंतनाशक पाजावे.
हिरव्या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण पुष्कळ असते. जनावरे फक्त हिरवा चारा खात असतील तर जनावरांचे पोट बिघडून अपचन, हगवण, बुळकांडी यांसारखे आजार होतात. यामुळे जनावरांना पावसाळ्यात थोडासा सुका चारा देणे गरजेचे आहे. यामुळे पचनसंस्था चांगली काम करते.
हिरवा चारा जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे रक्तात आम्लता वाढते ,त्यामुळे दुधातील स्निग्धता कमी होते. खाद्य,चारा भिजला असेल तर बुरशींची वाढ होते. असे खाद्य खाल्ल्यामुळे जनावरांना विषबाधा होते. विषबाधा झाली तर पशुवैद्यकाकडून उपचार करावेत.