Team Agrowon
भुईमूग लागवडीसाठी मध्यम चांगली भुसभुशीत, कॅल्शिअम आणि सेंद्रिय पदार्थयुक्त, चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ५.५ ते ७.५ असावा. चिकण माती किंवा भारी जमीन भुईमुगाच्या लागवडीसाठी योग्य नाही.
भुईमुगाचे उपटे, निमपसऱ्या आणि पसऱ्या असे प्रकार असतात. उपटा प्रकारातील पीक तीन ते चार महिन्यांत पीक तयार होते. पसरा आणि निमपसरा प्रकारातील पीक साधारणतः चार ते सहा महिन्यांत पीक तयार होते.
पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत करावी. या काळात हवामान उबदार असते. बियाणे चांगले रूजते. जमीन ओलावून त्यानंतर वापशावर पाभरीने किंवा बियाणे टोकून पेरणी करावी. टोकण पद्धतीने पेरणी केल्यास बियाण्याची बचत होते आणि उगवण अधिक चांगले होते.
पेरणी करताना दोन ओळींमध्ये सुमारे ३० सेंटीमीटर आणि दोन झाडांमध्ये सुमारे १० सेंटीमीटर अंतर ठेवावे. यामुळे प्रत्येक झाडाला पुरेसा प्रकाश, पाणी आणि पोषक तत्त्वे मिळतील.
उन्हाळी हंगामासाठी फुले उन्नती, फुले भारती, फुले चैतन्य या शिफारशीत जातींची लागवड करावी. छोट्या दाण्याच्या जातींसाठी प्रति हेक्टर १०० किलो, मध्यम आकाराच्या दाण्याच्या जातींसाठी १२५ किलो आणि मोठ्या दाण्याच्या जातींसाठी १२५ किलो बियाणे लागते.
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा ४ ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धक आणि २५ ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
पेरणीच्या वेळी माती परिक्षण अहवालानुसार प्रति हेक्टरी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद द्यावे. याशिवाय उत्पादनात वाढ करण्यासाठी जिप्सम खताचा वापर करावा. प्रति हेक्टरी ४०० किलो जिप्सम द्यावे. यापैकी २०० किलो पेरणीच्या वेळी आणि उर्वरित २०० किलो आऱ्या सुटताना द्यावे.
Sugarcane Trash Management : ऊस पाचट कुजविण्याचे तंत्र