Team Agrowon
ऊस तुटून गेल्यानंतर त्याच्या वजनाच्या १० ते १२ टक्के म्हणजे एकरी ५ ते ६ टन पाचट मिळत. पण बरेच शेतकरी पाचट जाळून टाकतात. जेव्हा पाचट जाळले जाते, तेव्हा त्यातील सेंद्रिय कर्बाचा पूर्णपणे नाश होतो.
एक एकरातून ५ ते ६ टन पाचट मिळते. त्यापासून २ ते ३ टन उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत बनते. त्यामधून १६ ते २० किलो नत्र, ८ ते १२ किलो स्फुरद आणि ३० ते ४० किलो पालाश इत्यादी अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
त्यासोबत कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सल्फर, लोह, मॅगेनीज आणि झिंक ही महत्वाची अन्नद्रव्ये असतात. तर त्यातील सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
ऊस तुटून गेल्यानंतर खोडव्यामध्ये पाचट कुजवायचं असेल तर खोडव्यामध्ये पाचट सरीआड सरी किंवा प्रत्येक सरीत ठेवू शकतो.
तोडणीनंतर उसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला सरीमध्ये लोटावे. उसाचे बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत.
बुडख्यांच्या छाटणीनंतर लगेच १ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो.
शेतात सरीमध्ये ठेवलेल्या पाचटावर प्रति एकरी ३२ किलो युरिया आणि ४० किलो सिंगल सुपर फॉस्फेट पसरावे.
त्यानंतर ४ किलो पाचट कुजविणारे जीवाणू संवर्धक ओलसर मातीमध्ये मिसळून समप्रमाणात पाचटावर पसरून टाकावे. त्यामुळे पाचट लवकर कुजते.