Team Agrowon
मुक्त व्यवस्थापन पद्धतीचा वापर ज्या भागात पाऊस, कमी पडतो, उष्ण, डोंगराळ भागात केला जातो. या पद्धतीमध्ये निसर्गातील उपलब्ध साधन सामग्रीचा वापर पूर्णपणे करून घेतला जातो.
अल्प भूधारक शेतकरी, शेतमजूर या पद्धतीचा अवलंब करताना दिसतात.
फार पूर्वीपासून व्यवसाय करणारे पारंपारिक पशुपालक उत्पन्नाचा चांगला स्रोत म्हणून शेळीपालन पूर्वीपासून या पद्धतीने करीत आहेत.
या पद्धतीमध्ये शेळ्यांची संख्या जास्त असते. शेळ्यांची संख्या पन्नासच्या पुढे असू शकते. कमी गुंतवणुकीमध्ये, कमी मजूर संख्या तसेच चारा, पाणी यांवरील खर्चाचे प्रमाणही अत्यल्प असते.
मात्र व्यापारी तत्वांवर शेळी पालनाचा व्यवसाय करण्यासाठी मुक्त संचार पद्धतीची शिफारस केली जात नाही. कारण या पद्धतीमध्ये शेळ्यांच्या चरण्यावर बंधन राहत नाही. तसेच लेंडीखतही वाया जाते.
शेळ्यांचे प्रजनन, आहार व्यवस्थापनावर योग्यरित्या लक्ष ठेवता येत नाही. शेळ्यांची दूध उत्पादन क्षमता लक्षात येत नाही.
करडांना योग्य आहार न मिळण्यास त्यांची वाढ खुंटून मृत्युचे प्रमाण वाढते. व्यावसायिकदृष्ट्या शेळीपालनाचा व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर मुक्त संचार पद्धत प्रभावी ठरत नाही. त्यासाठी शेळीपालकांनी बंदिस्त किंवा मिश्र पद्धतीचा अवलंब करावा.